क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेल्या मायकेल हसी या आपल्या सहकाऱ्याला तीन कसोटी विजयांचीच भेट देण्यासाठी ऑस्ट्रेलिया उत्सुक झाला आहे. श्रीलंकेविरुद्ध गुरुवारपासून येथे सुरू होणाऱ्या तिसऱ्या क्रिकेट कसोटीतही विजय मिळविण्याचा ऑस्ट्रेलियाचा निर्धार आहे.
पहिल्या दोन्ही कसोटी जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाने येथील तिसऱ्या कसोटीत चार वेगवान गोलंदाजांवरच भर देण्याचे ठरविले आहे. मिचेल स्टार्क, पीटर सिडल, जॅक्सन बर्ड, मिचेल जॉन्सन हे ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज सिडनीत आपला प्रभाव दाखविण्यासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क हा पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून गुरुवारपासून सुरू होणाऱ्या या लढतीत सहभागी होणार आहे. अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन हा पायातील स्नायू दुखावल्यामुळे या सामन्यात खेळणार नाही. अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याची बारावा खेळाडू म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे उस्मान ख्वाजा याला विश्रांती मिळणार आहे.
मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-० अशी विजयी आघाडी घेतल्यामुळे मालिकेला फारसे महत्त्व राहिलेले नाही. क्लार्क म्हणाला, ‘‘हसीचा शेवटचा सामना असल्यामुळे विजय मिळवूनच त्याला निरोप देण्याची आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करू.’’

Story img Loader