श्रीलंकेचा डाव फक्त १५६ धावांत कोसळला
मेलबर्नच्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस हा नाटय़पूर्ण घडामोडींनी युक्त असाच होता. या दिवशी दोन्ही संघांचे मिळून एकंदर १३ फलंदाज बाद झाले आणि हा सामना निर्णायक होण्याची ग्वाही पहिल्याच दिवशी दिली गेली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी श्रीलंकेचा पहिला डाव फक्त १५६ धावांत गुंडाळला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिला डाव फक्त सहा धावांच्या पिछाडीपर्यंत रेटला आहे. पण त्यासाठी त्यांचे तीन फलंदाज तंबूत परतले आहेत.
होबार्टची पहिली कसोटी १३७ धावांनीजिंकणाऱ्या यजमान ऑस्ट्रेलियाचा दुसरा कसोटी सामना पाहण्यासाठी बुधवारी सुमारे ६७,१३८ क्रिकेटरसिकांनी हजेरी लावली होती. कुमार संगकाराने कसोटी क्रिकेटमधील १० हजार धावांचा टप्पा ओलांडला, तर मिचेल जॉन्सनने कसोटी कारकिर्दीमधील २००वा बळी मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या ३ बाद १५० धावसंख्येत डेव्हिड वॉर्नरने ६ चौकार आणि एका षटकारासह सर्वाधिक ६२ धावा केल्या.

वॉर्नर आणि ईडी कोवान (३६) यांनी ९५ धावांची आक्रमक सलामी दिल्यानंतर अँजेलो मॅथ्यूसने सर्वप्रथम वॉर्नरला तंबूची वाट दाखवली. मग फिलिप ह्य़ुजेस आणि कोवान धावचीत झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाची ३ बाद ११७ अशी अवस्था झाली. खेळ थांबला तेव्हा कप्तान मायकेल क्लार्क २० आणि उपकर्णधार शेन वॉटसन १३ धावांवर खेळत होते. या दोघांनाही श्रीलंकेच्या क्षेत्ररक्षकांनी एकेक जीवदान दिले.
त्याआधी, श्रीलंकेच्या डावात फक्त कुमार संगकारानेच ५८ धावांची एकाकी झुंज दिली. यष्टीरक्षक मॅथ्यम व्ॉडने त्याचा लाजवाब झेल टिपला. त्यामुळेच जॉन्सनच्या खात्यावर ४९व्या कसोटी सामन्यात २००वा बळी जमा झाला. संगकाराने आपल्या १९५व्या कसोटी डावात दहा हजार धावांचा टप्पा गाठताना सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लाराच्या विक्रमाची बरोबरी साधली. होबार्ट कसोटीत न खेळणाऱ्या जॉन्सनला मेलबर्न कसोटीसाठी पाचारण करण्यात आले होते. त्याने १४ षटकांत ६३ धावांत ४ बळी मिळविण्याची किमया साधली.

Story img Loader