India vs Australia 2023 1st ODI Match Updates in Marathi : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आजपासून सुरु झाली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला एकदिवसीय सामना सुरु आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या टीम इंडियाच्या गोलंदाजांनी नाकीनऊ आणले. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियासाठी सलामीला आलेल्या ट्रेविस हेडची ५ धावांवर दांडी गुल झाली. त्यानंतर हार्दिक पांड्याने कर्णधार स्टीव्ह स्मिथला २२ धावांवर तंबूत पाठवलं. त्यानंतर मिचेल मार्शची अर्धशतकी खेळी वगळता ऑस्ट्रेलियाच्या इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या रचता आली नाही. त्यामुळे ३५. ४ षटकांमध्ये ऑस्ट्रेलिया १८८ धावांवर सर्वबाद झाली.
सुरुवातीच्या षटकांमध्ये दोन विकेट गेल्यानंतरही ऑस्ट्रेलियाचे फलंदाज दबावात खेळले नाहीत. मिचेल मार्शने चौफेर फटकेबाजी करून भारताच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. मार्शने ६५ चेंडूत ८१ धावा कुटल्या. जडेजाच्या गोलंदाजीवर मार्श बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच डाव गडगडला. भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करून ऑस्ट्रेलियायाला सर्वबाद १८८ धावसंख्येवर रोखलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने भारताला १८९ धावांचं आव्हान दिलं आहे. भारताला पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवण्यासाठी १८९ धावसंख्येचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.
ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ट्रेविस हेड आणि मिचेल मार्श सलामीसाठी मैदानात उतरले होते. पण सिराजच्या गोलंदाजीवर हेड स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. स्मिथने सावध खेळी करून ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण हार्दिक पांड्याने २२ धावांवर असताना स्मिथला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मोहम्मद शमीने ३ विकेट्स घेतल्या. सिराज आणि जडेजाने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तर हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवला एक विकेट मिळाली.
मिचेल मार्शची भारतीय गोलंदाजांवर चौफेर फटकेबाजी
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज मिचेल मार्शने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. ट्रेविस हेड स्वस्तात माघारी परतल्यानंतर मिचेल मार्शने दबावात न खेळता आक्रमक फटके मारण्यास सुरुवात केली. कर्णधार स्टीव्ह स्मिथला हार्दिक पांड्याने २२ धावांवर तंबूत पाठवलं. ऑस्ट्रेलियाच्या २ विकेट्स गेल्यानंतरही मिचेल मार्शने चौफेर फटकेबाजी करणं सुरुच ठेवलं. मार्शने ६५ चेंडूत ८१ धावा कुटल्या. १० चौकार आणि ५ षटकार ठोवून मार्शने वानेखेडे मैदानात धावांचा पाऊस पाडला. शतकाच्या उंबरठ्यावर असताना मार्शला रविंद्र जडेजाच्या गुगलीने ८१ धावांवर बाद केलं.