Australia Women vs South Africa Women T20 WC Final Match: आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२३ मधील अंतिम सामना आज खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ६ बाद १५६ धावा केल्या. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेसमोर १५७ धावांचे लक्ष्य ठेवले. ऑस्ट्रेलिया संघाकडून बेथ मुनीने ५३ चेंडूत नाबाद ७४ धावांची खेळी केली.
केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळल्या जात असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलिया संघाला पहिला धक्का अॅलिसा हिलीच्या रुपाने बसला. अॅलिसा हिलीने १८ धावांचे योगदान देऊन बाद झाली. तिला मारिझान कॅपने बाद केले.
यानंतर अॅशले गार्डनरने मुनीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. २१ चेंडूत २९ धावा करून गार्डनर क्लो ट्रायॉनच्या गोलंदजीवर झेलबाद झाली. आपल्या खेळीत त्याने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. ग्रेस हॅरिस नऊ चेंडूत १०धावा करून बाद झाला आणि कर्णधार मेग लॅनिंगने ११ चेंडूत १०धावा केल्या. एलिस पेरी पाच चेंडूंत सात धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. दरम्यान, बेथ मुनीने अर्धशतक झळकावले. दोन विश्वचषक फायनलमध्ये अर्धशतके झळकावणारी ती जगातील पहिली महिला खेळाडू ठरली.
अखेरच्या षटकात शबनीम इस्माईलने चौथ्या चेंडूवर एलिस पेरीला आणि पाचव्या चेंडूवर वेरेहमला बाद केले. तिला हॅट्ट्रिकची संधी होती, पण ताहिल मॅकग्राने शेवटच्या चेंडूवर एकच धाव घेतली. अशाप्रकारे शबनिमची हॅटट्रिक हुकली. बेथ मुनीने ५३ चेंडूंत नऊ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ७४ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून मारिजाने कॅप आणि शबनिम इस्माइलने प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी मलाबा आणि ट्रायॉन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
दक्षिण आफ्रिका महिला (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड, तझमिन ब्रिट्स, मारिझान कॅप, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, सुने लुस (कर्णधार), अनेके बॉश, सिनालो जाफ्ता (यष्टीरक्षक), शबनीम इस्माईल, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा
ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): अॅलिसा हिली (यष्टीरक्षक), बेथ मूनी, मेग लॅनिंग (कर्णधार), अॅशले गार्डनर, ग्रेस हॅरिस, एलिस पेरी, ताहलिया मॅकग्रा, जॉर्जिया वेरेहम, जेस जोनासेन, मेगन शट, डार्सी ब्राउन