Australia Women vs South Africa Women T20 WC Final Match: आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२३ मधील अंतिम सामना आज खेळला जाणार आहे. यामध्ये यजमान दक्षिण आफ्रिकेचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसहाला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी नाणेफेक पार पडली आहे. ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या स्पर्धेत सर्वाधिक जेतेपदे पटकावणारा ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्यांदा विजेतेपदाची हॅट्ट्रिक करू शकतो, अशी कामगिरी करणारा तो पहिला संघ ठरणार आहे.त्याच वेळी, दक्षिण आफ्रिकेने प्रथमच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे आणि त्यांना ही अद्भुत संधी गमावणे आवडणार नाही. याशिवाय दक्षिण आफ्रिकेला हे विजेतेपद मिळाल्यास हा ट्रॉफी मिळवणारा हा तिसरा यजमान संघ ठरेल. यापूर्वी २००९ मध्ये यजमान म्हणून इंग्लंडने हे विजेतेपद पटकावले होते, तर २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाने अशाच प्रकारे ट्रॉफी जिंकली होती.
महिला क्रिकेटमध्ये नेहमीच ऑस्ट्रेलियन संघाचा दबदबा राहिला आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा संघ इतिहास रचण्याच्या इराद्याने या स्पर्धेत खेळला आहे. दोन्ही संघ उत्कृष्ट लयीत आहेत. अशा स्थितीत अंतिम सामन्यात निकराची लढत होणार हे निश्चित आहे.
ऑस्ट्रेलियाचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास –
१.न्यूझीलंडचा ९७ धावांनी पराभव केला.
२.बांगलादेशचा आठ गडी राखून पराभव केला.
३.श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव केला.
४.दक्षिण आफ्रिकेचा १० गडी राखून पराभव केला.
५. भारताचा पाच धावांनी पराभव केला.
दक्षिण आफ्रिकेचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास –
१.श्रीलंकेविरुद्ध तीन धावांनी पराभव झाला.
२.न्यूझीलंडचा ६५ धावांनी पराभव केला.
३.ऑस्ट्रेलियाकडून सहा गडी राखून पराभव झाला.
४.बांगलादेशचा १० गडी राखून पराभव केला.
५.इंग्लंडचा सहा धावांनी पराभव केला.
दक्षिण आफ्रिका महिला (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड, तझमिन ब्रिट्स, मारिझान कॅप, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, सुने लुस (कर्णधार), अनेके बॉश, सिनालो जाफ्ता (यष्टीरक्षक), शबनीम इस्माईल, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा
ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): अॅलिसा हिली (यष्टीरक्षक), बेथ मूनी, मेग लॅनिंग (कर्णधार), अॅशले गार्डनर, ग्रेस हॅरिस, एलिस पेरी, ताहलिया मॅकग्रा, जॉर्जिया वेरेहम, जेस जोनासेन, मेगन शट, डार्सी ब्राउन