दिल्लीत घरच्या मैदानावर सूर सापडल्यानंतर शुक्रवारी धरमशाला येथे विराट कोहलीने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची पिसे काढत शतकी खेळी साकारली. वेगवान गोलंदाजांना साथ देणाऱ्या धरमशालाच्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करून विंडीजच्या मानसिकदृष्टय़ा खचलेल्या फलंदाजांना रोखत संघाला ५९ धावांनी विजय मिळवून दिला. विंडीज संघाने दौरा अर्धवट सोडण्याचा घेतलेला निर्णय आणि चौथ्या एकदिवसीय सामन्यातील या विजयामुळे भारताने पाच सामन्यांची ही मालिका २-१ अशी जिंकली आहे.
विराट कोहली, सुरेश रैना आणि अजिंक्य रहाणे यांच्या दमदार खेळीमुळे चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ३३० धावांचा डोंगर उभा केला. हे आव्हान पेलताना भारताच्या वेगवान गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजचा डाव सुरुवातीलाच गडगडला. मार्लन सॅम्युअल्सने शतकी खेळी करत एकाकी झुंज दिली खरी, पण भारताचे भले मोठे आव्हान पेलताना वेस्ट इंडिजला २७१ धावांपर्यंतच मजल मारता आली. ६ बाद १६५ अशा स्थितीतून सॅम्युअल्सने आंद्रे रसेलच्या साथीने कडवा प्रतिकार केला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी रचली. पण त्यांचे प्रयत्न अखेर यशस्वी होऊ शकले नाहीत. सॅम्युअल्सने ९ चौकार आणि ६ षटकारांची आतषबाजी करत ११२ धावांची खेळी केली. भारताकडून भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
कारकिर्दीत पहिल्यांदाच खराब फॉर्मात असलेल्या कोहलीने फेब्रुवारीनंतर पहिले शतक लगावत आपण फॉर्मात आल्याचे दाखवून दिले. कोहलीचे हे एकदिवसीय क्रिकेटमधील २०वे शतक ठरले. मानधनाच्या मुद्दय़ावरून वेस्ट इंडिज संघाने भारत दौरा अर्धवट सोडून जाण्याचा निर्णय घेतल्याचा परिणाम पाहुण्यांच्या गोलंदाजीवरही दिसून आला. धरमशालाच्या वेगवान खेळपट्टीवर चमकदार कामगिरीची अपेक्षा असतानाही विंडीजच्या गोलंदाजांनी निराशा केली.
सलामीवीर शिखर धवन आणि रहाणे यांनी भारताच्या डावाचा पाया रचताना ७० धावांची सलामी दिली. धवन झेलबाद झाल्यानंतर कोहली आणि रहाणे यांनी धोके पत्करत पूलचे फटके लगावून धावा वसूल केल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भर घालत भारताच्या डावाला आकार दिला. सुलेमान बेनने रहाणेला (६८) पायचीत पकडल्यानंतर कोहली-रैना जोडीची जुगलबंदी पुन्हा पाहायला मिळाली. कोहलीने सहजतेने फटके लगावत चाहत्यांना खूश केले. कोहलीने टेलरला तीन षटकार लगावत १३ चौकारांसह १२७ धावांची खेळी केली. त्याने रैनासोबत १३८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.
संक्षिप्त धावफलक
भारत : ५० षटकांत ६ बाद ३३० (विराट कोहली १२७, सुरेश रैना ७१, अजिंक्य रहाणे ६८; सुलेमान बेन १/३०) विजयी वि. वेस्ट इंडिज : ४८.१ षटकांत सर्व बाद २७१ (मार्लन सॅम्युअल्स ११२, आंद्रे रसेल ४६, डॅरेन ब्राव्हो ४०; भुवनेश्वर कुमार २/२५, अक्षर पटेल २/२६). सामनावीर : विराट कोहली.
‘विराट’शाला!
दिल्लीत घरच्या मैदानावर सूर सापडल्यानंतर शुक्रवारी धरमशाला येथे विराट कोहलीने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची पिसे काढत शतकी खेळी साकारली.
![‘विराट’शाला!](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/10/k04111.jpg?w=1024)
First published on: 18-10-2014 at 03:33 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Automatic india vs west indies 4th odi virat kohli steals no show