Avesh Khan has now revealed that he threw his helmet on the ground: आयपीएल २०२३ चा १५ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला होचा. या सामन्यात लखनऊने १ गडी राखून रोमांचक विजय नोंदवला. लखनौला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी एका धावेची गरज होती. स्ट्राईकवर असलेल्या आवेश खान बॅटला चेंडू न लागताच धावला आणि त्याने एक धाव पूर्ण करत संघाला विजय मिळवून दिला. विजयानंतर आवेशने आनंदात हेल्मेट जमिनीवर फेकले होते. यासाठी दंडही ठोठावण्यात आला होता. आता यावर आवेश खानने स्वत: खुलासा केला आहे.
आता आवेश खानने या प्रकरणावर मौन सोडले आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना लखनऊच्या गोलंदाजाने सांगितले की, ते खूप जास्त झाले होते. आवेश खानला नंतर कळाले की, आपण हे करू नये. आवेश म्हणाला, “हेल्मेटची घटना माझ्याकडून अति झाली होती. नंतर माझ्या लक्षात आले की, मी हे करायला नको होतो. हे त्या क्षणाच्या आनंदात घडले.”
आरसीबीच्या घरच्या मैदानावर लखनऊने मिळवला होता विजय –
लखनऊने आणि बंगळुरू यांच्यातील हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला होता. या सामन्यात आरसीबीला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत २ बाद २१२ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात लखनौने शेवटच्या चेंडूवर विजय नोंदवला.
आरसीबीने दुसऱ्या सामन्यात घेतला पराभवाचा बदला –
लखनऊ आणि आरसीबी यांच्यातील दुसरा सामना लखनऊच्या एकना स्टेडियमवर झाला, ज्यामध्ये आरसीबीने बाजी मारली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने २० षटकात ९ गडी गमावून १२६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनऊचा संघ १०८ धावांवर आटोपला. या सामन्यानंतर आरसीबीचा विराट कोहली आणि लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीर यांच्यात वादावादीही पाहायला मिळाली. सामन्याच्या मध्यंतराला लखनऊचा गोलंदाज नवीन उल हकचेही विराट काहोलीशी भांडन झाले होते.