महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील धावपटू अविनाश साबळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरीसाठी सज्ज झाला आहे. तो अॅथलेटिक्समधील ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात सहभाग नोंदवेल. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये अविनाश पात्रता फेरीत सातव्या स्थानी राहिला. त्या वेळी त्याने ८ मिनिटे १८.१२ सेकंद अशा वेळेसह राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. ऑलिम्पिकनंतर २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक, डायमंड लीगमध्ये सहावे स्थान अशी कामगिरी त्याने केली. २०२२ आशियाई क्रीडा स्पर्धेत अविनाशने स्टीपलचेसमध्ये सुवर्ण आणि ५००० मीटर स्पर्धेत रौप्य कामगिरी केली. आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तो पदकाच्या जवळ पोहोचणे अपेक्षित आहे.

कोणाकडून आव्हान?

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अविनाशला मोरोक्को आणि केनियाच्या धावपटूंचे आव्हान असणार आहे. सध्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला मोरोक्कोचा सॉफियान एल बक्काली पदकाच्या शर्यतीत आघाडीवर असेल. यासह केनियाच्या सिमोन किपरोप कोएच आणि अब्राहम किबिवोत यांच्याकडूनही त्याला आव्हान मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे अविनाशला भारतासाठी पदक मिळवायचे झाल्यास आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करण्याशिवाय पर्याय नाही.

हेही वाचा >>>Hardik Pandya : हार्दिकशी लग्न करण्यापूर्वी नताशाने अली गोनीशी दोनदा केला होता ब्रेकअप, पाहा VIDEO

कच्चे दुवे

● भारतीय संघाला धावण्याच्या स्पर्धांमध्ये अजूनपर्यंत एकही ऑलिम्पिक पदक मिळवता आलेले नाही. आता हा इतिहास पुसण्याचे अविनाशवर दडपण असेल. तसेच अपेक्षांचे ओझे जड होणार नाही याचीही त्याला काळजी घ्यावी लागेल.

● याच वर्षी झालेल्या डायमंड लीगमध्ये अविनाश सहाव्या स्थानी आला. त्या वेळी त्याने राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. मात्र, ऑलिम्पिक पदक मिळवायचे झाल्यास त्याला आपल्या वेळेत सुधारणा करणे गरजेचे असेल.

बलस्थाने

● गेल्या दोन वर्षांत अविनाश साबळेने आपली कामगिरी उंचावताना देशासाठी पदकांची कमाई करत चमक दाखवली. त्यातच बराच काळ परदेशात सराव केल्याचा फायदाही त्याला मिळू शकतो.

● २०२२च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अविनाशने रौप्यपदक मिळवले होते. त्या वेळी त्याने केनियाच्या नामांकित धावपटूंना आव्हान दिले होते. तसेच, सुवर्ण आणि कांस्यपदक केनियाच्या धावपटूंच्या नावे होती.