मुंबई : गोलंदाजांच्या भरीव कामगिरीनंतर १७ वर्षीय सलामीवीर आयुष म्हात्रेने (१६३ चेंडूंत नाबाद १२७) साकारलेल्या प्रथमश्रेणी कारकीर्दीतील पहिल्या शतकाच्या बळावर रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील महाराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात मुंबईने पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवले. महाराष्ट्राला १२६ धावांत गुंडाळल्यानंतर मुंबईने दिवसअखेर ३ बाद २२० धावांची मजल मारली. मुंबईकडे ९४ धावांची आघाडी होती.

वांद्रे-कुर्ला संकुल येथील शरद पवार क्रिकेट अकादमीच्या मैदानावर शुक्रवारपासून सुरू झालेल्या या सामन्यात महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, मुंबईच्या गोलंदाजांसमोर त्यांचा निभाव लागला नाही. खेळपट्टीतून मिळणारी मदत आणि हवेचा मुंबईच्या वेगवान गोलंदाजांनी सुरेख वापर केला.

हेही वाचा >>>WI vs NZ : धक्कादायक! झेल घेण्यासाठी गेलेल्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर आदळला वेगवान चेंडू, VIDEO होतोय व्हायरल

शार्दूल ठाकूर (२/५१) आणि मोहित अवस्थी (३/३१) यांनी चांगली सुरुवात करून दिल्यानंतर डावखुऱ्या रॉयस्टन डायसने (२/३२) महाराष्ट्राच्या मधल्या फळीला अडचणीत टाकले. या वेगवान गोलंदाजांच्या भेदक माऱ्यानंतर डावखुरा फिरकीपटू शम्स मुलानीने (३/७) तळाच्या फलंदाजांना झटपट माघारी धाडत महाराष्ट्राचा डाव अवघ्या १२६ धावांतच संपुष्टात आणला.

महाराष्ट्राच्या डावाची सुरुवातच अडखळती झाली. पहिल्याच षटकात अनुभवी शार्दूल ठाकूरने महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि सचिन धस यांना सलग दोन चेंडूंवर माघारी धाडले. या दोघांना खातेही उघडता आले नाही. सिद्धेश वीरलाही (११) फारसे योगदान देता आले नाही. अवस्थीने सिद्धेशसह अनुभवी अंकित बावणेचा (१७) अडसर दूर केला. यानंतर महाराष्ट्राचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत राहिले.

त्यानंतर फलंदाजीला आलेल्या मुंबईचीही सुरुवात निराशाजनक झाली. पृथ्वी शॉ (१) आणि हार्दिक तामोरे (४) यांना वेगवान गोलंदाज प्रदीप दाढेने स्वस्तात माघारी धाडले. मात्र, आयुष म्हात्रे आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (६४ चेंडूंत २१) यांनी मुंबईला आव्हानात्मक परिस्थितीतून बाहेर काढले. या दोघांनी ९९ धावांची भागीदारी रचली. डावखुरा फिरकीपटू हितेश वाळुंजने रहाणेचा अडसर दूर करून मुंबईला तिसरा धक्का दिला. मग आयुषला श्रेयस अय्यरची (५९ चेंडूंत नाबाद ४५) साथ लाभली. आयुषने दिवसाच्या अखेरच्या सत्रात प्रथमश्रेणी कारकीर्दीतील पहिले शतक पूर्ण केले. त्याने आणि श्रेयसने ९७ धावांची अभेद्या भागीदारी रचली आहे.

हेही वाचा >>>WI vs NZ : न्यूझीलंडने वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवत पटकावलं फायनलचं तिकीट, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार जेतेपदाची लढत

संक्षिप्त धावफलक

● महाराष्ट्र (पहिला डाव) : ३१.४ षटकांत सर्वबाद १२६ (निखिल नाईल ३८, अझीम काझी नाबाद ३६; शम्स मुलानी ३/७, मोहित अवस्थी ३/३१, रॉयस्टन डायस २/३२, शार्दूल ठाकूर २/५१)

● मुंबई (पहिला डाव) : ४९ षटकांत ३ बाद २२० (आयुष म्हात्रे नाबाद १२७, श्रेयस अय्यर नाबाद ४५, अजिंक्य रहाणे ३१; प्रदीप दाढे २/५१, हितेश वाळुंज १/३७)