Ayush Mhatre Under 19 Asia Cup 2024 : शारजाह येथील क्रिकेट मैदानावर भारत आणि जपान यांच्यात एसीसी अंडर-१९ आशिया चषक २०२४ चा आठवा सामना खेळला जात आहे. या सामन्यात जपान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारतासाठी सलामी देण्यासाठी वैभव सूर्यवंशीसह आलेल्या आयुष म्हात्रेने आपल्या वादळी अर्धशतक झळकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. म्हात्रेने २९ चेंडूंत १८६.२१ च्या तुफानी स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना जपानविरुद्ध ५४ धावा केल्या.
१७ वर्षीय आयुष म्हात्रेने केली कमाल –
मुंबईच्या १७ वर्षीय आयुष म्हात्रेने जपानविरुद्ध टीम इंडियाला शानदार सुरुवात करून दिली. तो ड्रेसिंग रूममधूनच सेट होऊन आल्यासारखे वाटत होते. त्याने येताच चौकार-षटकारांची बरसात करण्यास सुरुवात केली. आयुष म्हात्रेने २९ चेंडूंचा सामना करताना १८६.२१ च्या तुफानी स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना जपानविरुद्ध ५४ धावा केल्या. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ४ षटकारही मारले. अशा प्रकारे आयुषने अवघ्या १० चेंडूत ४८ धावा केल्या होत्या. म्हात्रेने पाकिस्तानविरुद्धही चांगली सुरुवात करुन दिली होती. पण त्याचे मोठ्या डावात रूपांतर करू शकला नाही आणि केवळ २० धावा करून तो बाद झाला होता.
भारताच्या डावाची सलामी देण्यासाठी वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे आले होते. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली. आयपीएल २०२५ मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सने १.१० कोटी रुपयांना विकत घेतलेला वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा आपली छाप सोडू शकला नाही. १३ वर्षीय सूर्यवंशी अवघ्या २३ धावा करून बाद झाला. वैभवने पाकिस्तानविरुद्ध केवळ १ धाव केली होती. मात्र, त्याचा जोडीदार आयुष म्हात्रेने आपल्या तुफानी फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. आरआरने वैभवला विकत घेतल्यापासून सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या आहेत. मात्र, आयपीएलमध्ये विकल्या गेल्यानंतर सूर्यवंशी काही मोठी कामगिरी करू शकलेला नाही.
हेही वाचा – Shoaib Akhtar : ‘भारताला भारतात हरवूनच या…’, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादानंतर शोएब अख्तरचा पाकिस्तानला सल्ला
रणजी ट्रॉफीमध्ये आयुष म्हात्रेने झळकावलंय शतक –
आयुष म्हात्रेने नुकतेच रणजी ट्रॉफीतील पहिले शतक झळकावले होते. महाराष्ट्राविरुद्ध त्याने हा पराक्रम केला होता. आयुषने आपल्या प्रथम श्रेणी करिअरमध्ये आतापर्यंत एकूण ६ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ११ डावांमध्ये ४०.०९ च्या सरासरीने ४४१ धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये म्हात्रेच्या नावावर दोन शतके आणि एक अर्धशतक आहे.