Ayush Mhatre Maiden List A Century in Vijay Hazare Trophy : असे म्हणतात की वयाचा तुमच्या प्रतिभेशी काहीही संबंध नसतो. तुमच्यात प्रतिभा असेल तर तुम्ही लहान वयातच सर्वोत्तम कामगिरी करू शकता. अलीकडेच मुंबईच्या १७ वर्षीय खेळाडूने हे सिद्ध केले आहे. मुंबई संघाचा १७ वर्षीय खेळाडू आयुष म्हात्रेने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत धुमाकूळ घातला आहे. त्याने नागालँडविरुद्ध ऐतिहासिक शतक झळकावले आहे.
वास्तविक, २०२४ च्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आज (३१ डिसेंबर) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीवर मुंबई आणि नागालँड यांच्यात विजय हजारे ट्रॉफी सामना खेळला जात आहे. या सामन्यात नागालँड संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई संघाच्या डावाची सुरुवात आयुष म्हात्रे आणि अंगक्रिश रघुवंशी यांनी केली. या दोघांनी मुंबई संघाला दमदार सुरुवात करून दिली आणि दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी १५६ धावांची भागीदारी झाली. आयुष बाद झाला, पण म्हात्रेने आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली.
आयुष म्हात्रेचा विश्वविक्रम –
आयुष म्हात्रे वयाच्या अवघ्या १७ वर्षे आणि १६८ दिवसांत लिस्ट ए क्रिकेटमध्ये १५० हून अधिक धावा करणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याने यशस्वी जैस्वालचा यापूर्वीचा विक्रम मोडला. यशस्वीने २०१९ मध्ये झारखंडविरुद्ध हा पराक्रम केला होता. तेव्हा त्याचे वय १७ वर्षे आणि २९१ दिवस होते.
आयुष म्हात्रेने ११७ चेंडूंचा सामना करताना १८१ धावा केल्या. १७ वर्षीय आयुषने लिस्ट-ए क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले. मात्र, त्याचे दुहेरी शतक अवघ्या १९ धावांनी हुकले. या कालावधीत त्याचा स्ट्राईक रेट १५४ पेक्षा जास्त होता आणि त्याच्या खेळीत एकूण ११ षटकार आणि १५ चौकारांचा समावेश होता. आयुषशिवाय आंगक्रिशने ५६ धावांची खेळी खेळली. त्याचवेळी कर्णधार शार्दुल ठाकूरने ७३ धावांची नाबाद खेळी केली. अशाप्रकारे मुंबई संघाने ५० षटकांत ७ गडी गमावून ४०३ धावा केल्या. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये मुंबई संघाची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली.
u
आयपीएल २०२५ च्या लिलावापूर्वी सीएसकेने ट्रायलसाठी केले होते निमंत्रित –
आयपीएल २०२५ च्या लिलावात आयुष म्हात्रेला खरेदी करण्यात कोणत्याही फ्रँचायझीने स्वारस्य दाखवले नाही. लिलावापूर्वी आयुषला सीएसकेने ट्रायलसाठी बोलावले होते. असे मानले जात होते की हा १७ वर्षांचा खेळाडू धोनीच्या संघात सामील होईल, परंतु जेव्हा त्याला लिलावात समाविष्ट करण्यात आले, तेव्हा त्याच्यावर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. आता त्याच्या शतकी खेळीनंतर सर्वच फ्रँचायझींना पश्चाताप होत असेल.