Ayush Shukla becomes third player to bowl four maidens in T20Is : हाँगकाँग क्रिकेट संघाने आश्चर्यकारक कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेच्या सामन्यात हाँगकाँगने मंगोलियावर ९ गडी राखून विजय मिळवला. आश्चर्याची बाब म्हणजे हाँगकाँगने हे लक्ष्य अवघ्या १० चेंडूत पूर्ण केले. या सामन्यात हाँगकाँगसमोर विजयासाठी १८ धावांचे लक्ष्य होते. दरम्यान भारतीय वंशाचा वेगवान गोलंदाज आयुष शुक्लाने आपल्या दमदार गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने या सामन्यात चार षटकं गोलंदाजी करताना एकही धाव ने देता एक विकेट घेऊन इतिहास घडवला आहे.
आयुष शुक्लाची ऐतिहासिक कामगिरी –
हाँगकाँगकडून एहसान खानने पाच धावांत चार बळी घेतले. अनस खान आणि यासीम मुर्तझा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. मात्र, या सगळ्यात ४ षटकांत एकही धाव न देता एक विकेट घेणाऱ्या वेगवान गोलंदाज आयुष शुक्लाने सर्वांचे लक्ष वेधले. भारतीय वंशाचा आयुष शुक्ला आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये त्याच्या चारही षटके मेडन टाकणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे.याआधी केवळ साद बिन जफर (कॅनडा) आणि लॉकी फर्ग्युसन (न्यूझीलंड) हे करू शकले आहेत.
२०२१ साली कूलिज येथे झालेल्या टी-२० विश्वचषक अमेरिका क्षेत्र पात्रता सामन्यात साद जफरने पनामाविरुद्ध ४-४-०-२ असा स्पेल टाकला होता. लॉकीने टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये पापुआ न्यू गिनीविरुद्ध ही कामगिरी केली होती. पापुआ न्यू गिनीविरुद्ध, लॉकीने ४-४-०-३ अशा जादुई आकड्यांसह सामना संपवला होता.
हेही वाचा – Azam Khan CPL 2024 : वेगवान बाऊन्सर गळ्यावर बसला आणि आझम खान कोसळला; काय झालं पुढे? पाहा VIDEO
मंगोलियाला १४.२ षटकात केवळ १७ धावा करता आल्या –
ब्युमास ओव्हल, क्वालालंपूर येथे ३१ ऑगस्ट (शनिवार) रोजी झालेल्या या सामन्यात हाँगकाँगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हाँगकाँगचा हा निर्णय अगदी योग्य ठरला. मंगोलियाचा संघ अवघ्या १४.२ षटकांत १७ धावांत गडगडला. एकाही मंगोलियन फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. मंगोलियाकडून मोहन विवेकानंदनने १८ चेंडूत सर्वाधिक ५ धावा केल्या. तर लुवसंजुंडुई एर्डनबुलगन, दावसुरेन जामियनसुरेन आणि गंडेम्बेरेल गॅम्बोल्ड यांनी प्रत्येकी दोन धावा केल्या.
हाँगकाँगसाठी या सामन्यात झीशान अली १५ धावांवर नाबाद तर कर्णधार निझाकत खान १ धावा नाबाद माघारी परतला. जेमी ऍटकिन्सन (२) हा एकमेव फलंदाज बाद झाला. ॲटकिन्सनला ओड लुटबायरने बाद केले. हाँगकाँगचा संघही काही वेळा आशिया कपमध्ये सहभागी झाला आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या खेळाडूंना मोठ्या संघांविरुद्ध खेळण्याचा अनुभव आहे.
हेही वाचा – US Open 2024 : यूएस ओपनमध्ये अल्काराझपाठोपाठ जोकोव्हिचला पराभवाचा दणका, ॲलेक्सी पोपिरिनने मारली बाजी
हाँगकाँगने केला मोठा विक्रम –
या सामन्यात हाँगकाँगने ११० चेंडू शिल्लक असतानाच लक्ष्य गाठले. आंतरराष्ट्रीय टी-२० मधील चेंडूंच्या बाबतीत हा तिसरा सर्वात मोठा विजय ठरला. या बाबतीत, स्पॅनिश संघ आघाडीवर आहे, ज्याने ११८ चेंडू शिल्लक असताना आयल ऑफ मॅनचा पराभव केला होता. २०२३ साली स्पेन आणि आयल ऑफ मॅन यांच्यातील टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला होता. जपानचा संघ या यादीत दुस-या स्थानावर आहे, त्याने यावर्षी मे महिन्यात मंगोलियाविरुद्ध ११२ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला होता.