बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेन्का हिने एकेरीत दुसऱ्या फेरीकडे वाटचाल केली. तिने अनास्ताशिया पॅव्हिचेन्कोवा हिच्यावर ७-६ (१०-८), ७-६ (७-३) असा रोमहर्षक विजय मिळविला. दोन्ही सेट्समध्ये चिवट लढत पहावयास मिळाली. पायाच्या दुखापतीमधून नुकतीच तंदुरुस्त झालेल्या अझारेन्का हिला हा सामना जिंकण्यासाठी खूपच संघर्ष करावा लागला. सानियाची दुहेरीत आगेकूच भारताच्या सानिया मिर्झा हिने अमेरिकेच्या बेथानी मिटेक-सँड्स हिच्या साथीत माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेतील दुहेरीत अपराजित्व राखले. पाचव्या मानांकित मिर्झा व बेथानी यांनी डॅनिएला हांचुकोवा व अ‍ॅनाबेल मेदिना गॅरिक्स यांच्यावर ७-६ (७-३), ४-६, १०-४ असा रोमहर्षक विजय मिळविला.
चुरशीने झालेल्या या लढतीत मिर्झा व बेथानी यांना पहिल्या सेटमध्ये सव्‍‌र्हिसवर नियंत्रण राखताना संघर्ष करावा लागला. अखेर हा सेट त्यांनी टायब्रेकरद्वारा घेतला. दुसऱ्या सेटमध्ये त्यांची सव्‍‌र्हिस छेदली गेली. तथापि हा सेट गमावल्यानंतर त्यांनी तिसऱ्या सेटमध्ये सव्‍‌र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण मिळविले.
अन्य लढतीत सातव्या मानांकित झांग शुआई व झांग जेई यांना पराभवाचा धक्का बसला. ख्रिस्तिना मिदेनोविक व गॅलिना व्होस्कोबोएव्हा यांनी त्यांच्यावर ६-४, ६-१ असा सफाईदार विजय मिळविला. सेरेना विल्यम्सने स्पेनच्या लॉड्रेस डॉम्निग्युझवर ६-२, ७-५ अशी मात करत दुसऱ्या फेरीत आगेकूच केली. पुरुष गटात जॅन्को टिप्सारेव्हिचला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले.

Story img Loader