ICC Men’s ODI cricketer of the year Azmatullah Omarzai: सध्या आयसीसी अवॉर्ड्स २०२४ जाहीर केले जात आहेत. खेळाडूंनी २०२४ मध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी आयसीसीकडून प्रत्येक क्रिकेट फॉरमॅटमधील उत्कृष्ट खेळाडूला पुरस्कार जाहीर करत आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानच्या खेळाडूने इतिहास घडवला आहे. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अफगाणिस्तानच्या खेळाडूने आयसीसीचा प्लेयर ऑफ द इय़र पुरस्कार जिंकला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ICC ने २०२४ मधील सर्वाेत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटूचा पुरस्कार अफगाणिस्तानच्या अजमतुल्ला ओमरझाईला दिला आहे. २०२४ मध्ये त्याने अष्टपैलू कामगिरी केली आणि संघाला अनेक सामने स्वबळावर जिंकून दिले. त्याच्या याच कामगिरीची आयसीसीने दखल घेतली.

अजमतुल्ला उमरझाईने २०२४ मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये ४१७ धावा केल्या आहेत आणि १७ विकेट देखील घेतल्या आहेत, ही कामगिरी त्याने केवळ १४ एकदिवसीय सामन्यांमध्ये केली आहे. त्याने ५२.१२ च्या सरासरीने धावा केल्या आहेत आणि २०.४७ च्या सरासरीने विकेट्स घेतल्या आहेत.

अझमतुल्ला ओमरझाईच्या आधी, राशिद खानला २०१० च्या दशकातील सर्वोत्तम टी-२० क्रिकेटर म्हणून गौरवण्यात आले होते. यानंतर आयसीसीने वनडेमधील सर्वाेत्कृष्ट पुरस्कार देण्यासाठी अफगाणिस्तानच्या उमरजाईची निवड केली आहे. उमरझाई हा अफगाणिस्तानसाठी एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे.

उमरझाईने २०२१ मध्ये वनडेमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने आतापर्यंत ३६ वनडे सामने खेळले असून ३० विकेट घेतले आहे. तर फलंदाजीत त्याने आतापर्यंत ९०८ धावा केल्या आहेत. तर टी-२० मध्ये उमरझाईने ४७ सामन्यांमध्ये ३१ विकेट आपल्या नावे केल्या आहेत तर ४७४ धावाही केल्या.

अफगाणिस्तान संघाने २०२४ मध्ये बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि आयर्लंडविरुद्ध एकूण १४ एकदिवसीय सामने खेळले. अफगाणिस्तानने या १४ पैकी ८ एकदिवसीय सामने जिंकले आणि ५ सामन्यांमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर १ सामना अनिर्णित राहिला. अझमुतुल्ला ओमरझाई गेल्या वर्षी खेळलेल्या जवळपास सर्व एकदिवसीय सामन्यांमध्ये अफगाण संघाचा भाग होता आणि त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

१९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तानचा संघ प्रथमच खेळताना दिसणार आहे. वनडे फॉरमॅटमध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत अफगाणिस्तान अजून कोणत्या संघाना पराभवाचा धक्का देणार हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे. अफगाणिस्तानने भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये मोठमोठ्या संघांना पराभवाचा धक्का दिला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Azmatullah omarzai becomes 1st afghanistan player to win icc mens odi player of the year 2024 bdg