बाबा बोकील स्मृती टेबल टेनिस स्पर्धा
सलील गायधनी, प्राची यंदे, सौमित देशपांडे, साक्षी अफजलपूरकर, विरेन पटेल, अनुजा झंवर यांनी येथील शिवसत्य क्रीडा मंडळाच्या टेबल टेनिस संकुलात आयोजित आठव्या बाबा बोकील स्मृती टेबल टेनिस स्पर्धेत विविध गटांमध्ये विजेतेपद मिळविले.
ज्येष्ठ क्रीडा संघटक व मार्गदर्शक बाबा बोकील यांच्या स्मृतीनिमित्त शशांक वझे यांच्या पुढाकाराने आठ वर्षांपासून नियमितपणे या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. स्पर्धेत १२ वर्षांआतील गटात सलील गायधनी, प्राची यंदे विजेते ठरले. १५ वर्षांआतील गटात सौमित देशपांडे, साक्षी अफजलपूरकर यांनी विजेतेपद मिळविले. १९ वर्षांआतील गटात विरेन पटेलने सौमित देशपांडेवर ११-९, १४-१६, ११-६, १३-११ याप्रमाणे ३-१ असा पराभव केला. मुलींमध्ये अनुजा झंवरने विजेतेपद पटकावले. स्पर्धेत प्रथम मानांकित सायली वाणी आणि दीपा भुजबळ यांना उपांत्य फेरीतच पराभव पत्करावा लागला. १२ वर्षांआतीस गटात प्रथम मानांकित सायलीला उपांत्य फेरीत तनिषा कोटेचाने ३-१ तर १८ वर्षांआतील गटात प्रथम मानांकित दीपा भुजबळला श्रेया मुत्तुकुमारने ३-२ असे पराभूत केले.
विजेत्यांना भारतीय तलवारबाजी संघटनेचे सरचिटणीस अशोक दुधारे, नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे खजिनदार शेखर भंडारी, डॉ. मयुरेश कुलकर्णी आदींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत आयोजक शशांक वझे यांनी केले. आनंद खरे यांनी सूत्रसंचालन केले.
अपंग जलतरणपटूंची
यशस्वी कामगिरी
नाशिक येथील श्रेयस द्विवेदी व शंकर खराटे या अपंग जलतरणपटूंनी सातपूर येथील तलावात माजी महापौर दशरथ पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत अनुक्रमे प्रथम व तृतीय क्रमांक मिळवला. श्रेयसने यापूर्वी अनेक वेळा जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच पॅराऑलिम्पिक स्पर्धेत पदकांची कमाई केली आहे. श्रेयसला दोन्ही हात नाहीत. त्याच्या पायातही व्यंग आहे. बिल्होळीत राहणाऱ्या शंकरची कहाणी थक्क करणारी आहे. आईचे लहानपणीच निधन झालेले असून वडिलांनी त्यास सोडून दिले आहे. त्याच्या आजीचेही काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यामुळे तो पूर्णत: निराधार झाला असून कोणी काही दिल्यास ते खाणे, कुठेही झोपणे, अशी शंकरची व्यथा आहे. एके दिवशी त्याची जलतरण प्रशिक्षक वाळू नवले यांच्याशी भेट झाली. नवले यांनी त्यास जलतरण तलावात शास्त्रयुक्त पोहणे शिकविले. त्यास गुडघ्यापासून उजवा पाय नाही. दुसऱ्या पायाला बोटे नाहीत. एका हाताला तीनच बोटे असून तीही जुळलेली आहेत. तो सध्या नवले यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचा सराव करत आहे.
ललित मानवडे
‘नाशिक श्री’चा मानकरी
नाशिक जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या सहकार्याने चांदवड येथील नेमिनाथ जैन महाविद्यालयात आयोजित आंतर महाविद्यालयीन ‘नाशिक श्री २०१५’ स्पर्धेत मानाचा किताब इगतपुरीच्या ललित मानवडेने मिळवला. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्यासह क्रीडा संचालक प्रा. दत्ता शिंपी, प्रा. प्रवीण व्यवहारे, जिल्हा संघटनेचे गोपाळ गायकवाड, गोपीनाथ रोडे आदी उपस्थित होते. स्पर्धेत जिल्ह्य़ातील ३० शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेतला. प्रत्येक वजनी गटातील प्रथम व द्वितीय क्रमांक विजेत्याची श्रीरामपूर येथे होणाऱ्या आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांची नावे गटनिहाय पुढील प्रमाणे- ६० किलो गणेश पांचाळ (मालेगाव), ६५ किलो शशिकांत चव्हाण (इगतपुरी), ७० किलो पवन पवार (इगतपुरी), ७५ किलो ललित मानवडे (इगतपुरी), ८० किलो प्रमोद दिलोर (मालेगाव), ८५ किलो श्रीकांत शेरताटे (पंचवटी), ९० किलो योगेश नवले, ९० किलोवरील गट प्रशांत जाधव (नाशिकरोड) यांचा समावेश आहे.
गणेश मूकबधिर मंडळाची व्हॉलीबॉल स्पर्धा
नाशिक येथे श्री गणेश मूकबधिर मित्र मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त यशवंत व्यायामशाळेच्या मैदानावर आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेत नाशिक ब संघ विजेता ठरला. स्पर्धेच्या उद्घाटनास माई लेले श्रवण विकास केंद्रच्या मुख्याध्यापिका वैशाली घारपुरे, समाज कल्याण अधिकारी पी. यु. पाटील, आनंद खरे उपस्थित होते. घारपुरे यांनी साजिद सय्यद स्मृती दिनानिमित्त आदरांजली वाहिली. समाजकल्याण खात्याकडून अपंगांना सर्व परीने मदत करण्याचे, तर खरे यांनी मूकबधिर मुला-मुलींना मोफत प्रशिक्षण व व्यायाम शाळेचे मैदान उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. मंडळाचे संस्थापक सुशांत गालफाडे यांनी आभार मानले. सचिव शंतनु पंडित यांनी सत्कार केला या प्रसंगी सहसचिव बिस्मिल्ला शाह, योगेश मोरे, कैलास बुरड, सुधीर फडके, देवेंद्र वाघ उपस्थित होते. स्पर्धेत बिस्मिल्ला शाह यांचा नाशिक ब संघ विजेता, ज्ञानेश्वर रिकामे यांचा नाशिक क संघ उपविजेता, योगेश मोरे यांचा नाशिक अ तृतीय तर सुधाकर मोरे यांचा नाशिक ड संघ चौथा आला.
टेनिस व्हॉलीबॉलची
आज जिल्हा स्पर्धा
नाशिक जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल संघटनेच्या वतीने १७ डिसेंबर रोजी लहान आणि युवा या दोन गटाच्या जिल्हा स्पर्धेचे आयोजन यशवंत व्यायाम शाळेच्या क्रीडांगणावर करण्यात आले आहे. लहान गटासाठी खेळाडूंची जन्मतारीख एक जून २००२ किंवा त्यानंतरची असावी, तर युवा गटासाठी ती एक जून १९९५ किंवा त्यानंतरची असावी. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे डोंबिवलीत २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या १७ व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड करण्यात येणार आहे. ज्या खेळाडूंना या स्पर्धेत सहभाग घ्यावयाचा असेल अशांनी गुरूवारी दुपारी तीन वाजता स्पर्धास्थळी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी अविनाश खैरनार ९९२१८८८१०२ अथवा मनोज म्हस्के ९७६४०८७०३३ यांच्याशी संपर्क करावा
डॉ. व्हीस पेस यांचे नाशिकच्या टेनिसपटूंना मार्गदर्शन
आंतरराष्ट्रीय टेनिसपटू लिएँडर पेस यांचे वडील डॉ. व्हीस पेस यांनी टेनिसमध्ये प्रशिक्षकाचे महत्व किती याविषयी मार्गदर्शन केले. लिएंडरला घडविताना आलेले अनुभव, त्याचा व्यायाम व आहारावर दिलेले लक्ष आंतरराष्ट्रीय कारकीर्दीसाठी किती महत्वपूर्ण ठरले याचा आलेखच त्यांनी मांडला.
नाशिक जिल्हा लॉन टेनिस संघटना, सातपूरचे निवेक क्लब यांच्या वतीने जिल्ह्य़ातील उदयोन्मुख खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण, तुंदुरूस्ती, मानसिक संतूलन, आहार-विहार या विषयांवर येथे दृकश्राव्य सादरीकरण तसेच प्रत्यक्ष कोर्टवर खेळाडूंच्या गुणात्मक वृद्धीसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत डॉ. पेस यांनी मार्गदर्शन करताना प्रशिक्षक हा स्वत: राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू असावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रशिक्षकाने खेळाडूंसोबत रोज कमीतकमी दोन तास व्यक्तीगत सराव करावा. तरच ते खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळी गाठू शकतात. प्रशिक्षणासाठी क्ले कोर्ट सर्वोत्तम असून त्यावर खेळाडूंना कमीतकमी इजा होते. लिएँडरला घडविताना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण, व्यायाम व आहार यावर विशेष लक्ष दिले, असे डॉ. पेस यांनी नमूद केले.
क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भिष्मराज बाम यांनी प्रशिक्षण व स्पर्धेप्रसंगी शारीरिक व मानसिक संतूलन कसे राखावे याविषयी माहिती दिली. कार्यशाळेत मनोज वैद्य, जिलानी शेख, हेमंत बंदरे, महेंद्र गोखले यांनीही मार्गदर्शन केले. अशा प्रकारची कार्यशाळा याआधी राज्य संघटनेच्या वतीने पुणे व औरंगाबाद येथे झाली आहे.
एसएमआरके क्रीडा महोत्सव
नाशिक येथील एसएमआरके महाविद्यालयाच्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन समाजकल्याण अधिकारी डॉ. अनिता राठोड यांच्या हस्ते आणि प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. राष्ट्रीय खेळाडू अलिना खानने क्रीडा ज्योत प्रमुख पाहुण्यांकडे सुपूर्द केली. डॉ. राठोड यांनी शाळा व महाविद्यालय हे व्यक्तीमत्व घडण्याचे हक्काचे व्यासपीठ असल्याचे नमूद केले. प्राचार्य डॉ. देशपांडे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्तविक प्रा. कविता खोलगडे यांनी केले. आभार प्रा. गंगाधर अहिरे यांनी मानले. सूत्रसंचालन मिताली खेडकरने केले.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. मोहिनी पेटकर, डॉ. कविता पाटील, दीपाली खोडदे आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर झालेल्या स्पर्धामध्ये कनिष्ठ विभागात – बुद्धिबळमध्ये रेवती बेलगावकर, योगामध्ये साक्षी साकळीकर, टेबल टेनिसमध्ये विशाखा काशीकर प्रथम आले. वरिष्ठ महाविद्यालयीन गटात बुद्धिबळमध्ये ऐश्वर्या सोनवणे, योगामध्ये मेघा कोठारी, टेबल टेनिसमध्ये कविता कांगणे, थ्रो बॉलमध्ये गृहविज्ञान विभाग यशस्वी ठरला.
कबड्डीत वाणिज्य विभागाने बाजी मारली.
नाशिक येथे शिवसत्य क्रीडा मंडळातर्फे आयोजित बाबा बोकील स्मृती टेबल टेनिस स्पर्धेतील विजेत्यांसह अशोक दुधारे, शेखर भंडारी, डॉ. मयुरेश कुलकर्णी व स्पर्धेचे आयोजक शशांक वझे