कराची : जानेवारी महिन्यात न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना पाकिस्तानच्या संघात स्थान देण्यात येणार असल्याची शाश्वती निवड समितीचा अध्यक्ष वहाब रियाझने त्यांना दिली आहे.
पाकिस्तानचा संघ सध्या ऑस्ट्रेलियात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर पाकिस्तान संघ न्यूझीलंडला जाणार असून तेथे पाच सामन्यांची ट्वेन्टी-२० मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा ३६० धावांनी पराभव झाला. त्यानंतर पाकिस्तानातील प्रसारमाध्यमांनी न्यूझीलंड दौऱ्यासाठी बाबर आणि रिझवान यांना विश्रांती दिली जाणार असल्याची बातमी दिली होती. मात्र, हे दोघेही अनुभवी खेळाडू ट्वेन्टी-२० मालिकेत खेळण्यास उत्सुक असल्याने त्यांनी निवड समितीकडे याबाबत विचारणा केली.
हेही वाचा >>> IND vs SA: पहिल्या कसोटी सामन्यात कोणाला मिळणार विकेटकीपर म्हणून संधी? के.एल. राहुल की के.एस. भरत, जाणून घ्या
‘‘बाबर आणि रिझवान यांनी आपल्याला विश्रांतीची आवश्यकता नसल्याचे निवड समितीच्या अध्यक्षांना कळवले आहे,’’ असे या दोनही खेळाडूंच्या जवळील असलेल्या सूत्राकडून सांगण्यात आले. ‘‘वहाब रियाझने निवड समितीच्या अन्य सदस्यांना बाबर आणि रिझवानला काही ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी विश्रांती देण्याबाबत सुचवले होते. मात्र, न्यूझीलंडविरुद्धची मालिका अत्यंत महत्त्वाची असून तेथील वातावरणात खेळण्याचा पाकिस्तानच्या खेळाडूंना फारसा अनुभव नाही. त्यामुळे या दोघांनी संघात असले पाहिजे, असे अन्य सदस्यांनी वहाबला सांगितले. त्यालाही ते पटले. त्याने बाबर आणि रिझवान यांना न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी पाकिस्तानच्या संघात स्थान देण्याची शाश्वती दिली आहे,’’ असेही सूत्राने सांगितले.