भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेमधील दुसऱ्या सामन्यामध्ये भारताचा १०० धावांनी पराभव झाला. लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यामध्ये भारतीय फलंदाजांनी नांगी टाकल्याने इंग्लंडला मालिकेत बरोबर साधता आली. इंग्लंडच्या एकट्या रीस टॉपलीने भारताचे सहा फलंदाजांना बाद केले. त्यामुळे भारताचा सर्व संघ १४६ धावांमध्येच गुंडाळला गेला. विराट कोहलीला या सामन्यामध्येही चमक दाखवता आली नाही. विराट कोहलीच्या खराब कामगिरीमध्ये या सामन्याच्या निमित्ताने आणखीन एका सामन्याची भर पडली. मात्र विराट बाद झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये पाकिस्तानचा सलामीवीर आणि कर्णधार बाबार आझमने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
नक्की वाचा >> बुमराह सर्व फॉरमॅटमधील सर्वोत्तम गोलंदाज असल्याच्या दाव्यावर पाकिस्तानचा माजी कर्णधार म्हणाला, “शाहीन आफ्रिदी त्याच्यापेक्षा…”
२४७ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवातच चाचपडत झाली. पहिल्या दोन षटकांमध्ये भारतीय फलंदाजांच्या बॅटमधून एकही धाव आली नाही. त्यानंतर भारताच्या सलामीवीरांनी हजेरी लावण्याचं काम केल्यासारख्या विकेट फेकल्याचं चित्र पहायला मिळालं. स्वस्तात तंबूत परतणाऱ्यांमध्ये यावेळेसही विराट कोहलीचा समावेश होता. सामन्यातील ११ व्या षटकामध्ये विराट कोहली बाद झाला. विराट २५ चेंडूंमध्ये १६ धावा करुन संघाचा धावफलक ३१ वर असताना तंबूत परतला. तो पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर जॉस बटलरकरवी झेलबाद झाला.
विराट बाद झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये एकदिवसीय क्रिकेटच्या जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी असणाऱ्या बाबर आझमने विराटसोबतचा फोटो ट्विटरवरुन पोस्ट केला. टी-२० विश्वचषकाच्या सामन्यादरम्यानच्या या फोटोमध्ये कोहली आणि बाबर आझम एकत्र चालताना दिसत आहेत. या फोटोला बाबारने एक सुंदर कॅप्शन दिली आहे. विराटला पाठिंबा देण्यासाठी बाबरने, “हा वेळही निघून जाईल. खंबीर राहा,” असा संदेश या फोटोसोबत विराटला दिलाय. त्याने विराटच्या नावाचा हॅशटॅगही वापरला आहे.
नक्की पाहा >> फलंदाजाने मारला भन्नाट षटकार; चेंडू थेट मैदानाबाहेरील रस्त्यावर चालणाऱ्या तरुणाच्या पोटात लागला, Video होतोय Viral
एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंनी एकमेकांना अशा बॅड पॅचच्यादरम्यान असा पाठिंबा देताना पाहून क्रिकेट चाहत्यांनी समाधान व्यक्त केलंय. ३३ हजाराहून अधिक वेळा बाबरने पोस्ट केलेलं हे ट्वीट रिट्विट करण्यात आलंय. त्यापैकी २७ हजार नुसते रिट्विट असून आणि सहा हजारांहून अधिक ट्वीट हे कोटेड म्हणजेच प्रतिक्रियांसहीतचे ट्वीट्स आहेत.
विराटची कामगिरीत घसरण
कर्णधारपद सोडल्यानंतर कोहलीच्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील कामगिरीत घसरण झाली आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकामधील खराब कामगिरीमुळे कोहलीने भारताचे कर्णधारपद सोडले. परंतु ‘बीसीसीआय’ने मर्यादित षटकांच्या दोन्ही क्रिकेटसाठी एकच कर्णधार असावा, या धोरणासाठी त्याचे एकदिवसीय क्रिकेटचे कर्णधारपदही काढून घेतले. ट्वेन्टी-२० क्रिकेटचे कर्णधारपद सोडल्यानंतर विंडीजविरुद्ध दोन आणि इंग्लंडविरुद्ध दोन अशा चार सामन्यांत त्याने प्रतिनिधित्व केले. यात २०.२५च्या धावसरासरीने त्याने एकूण ८१ धावा (१७, ५२, १, ११) काढल्या आहेत. परंतु त्याची ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील धावसरासरी ५०.१२ अशी आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन आणि विंडीजविरुद्ध तीन अशा एकूण सहा सामन्यांत कोहलीने २३.६६च्या सरासरीने फक्त १४२ धावा (५१,०, ६५, ८, १८, ०) केल्या आहेत. परंतु त्याची एकदिवसीय क्रिकेटमधील एकूण सरासरी ५८.०७ धावा अशी आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका गमावल्यानंतर कसोटी क्रिकेट कर्णधारपद सोडणारा कोहली नंंतर श्रीलंकेविरुद्ध दोन आणि इंग्लंडविरुद्ध एक असे एकूण तीन कसोटी सामने खेळला. या सामन्यांत एकूण ११२ (४५, २३, १३, ११, २०) धावा केल्या. त्याच्या कसोटी कारकीर्दीतील फलंदाजीची सरासरी ४९.५३ आहे. पण या तीन सामन्यांची सरासरी २२.४ धावांपर्यंत घसरली आहे.