लाहोर : ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेला अवघे दोन महिने बाकी असताना पाकिस्तानने मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी पुन्हा एकदा बाबर आझमकडे कर्णधारपद सोपवले आहे. शाहीन आफ्रिदीला केवळ एका मालिकेनंतर ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून हटविण्यात आले आहे. निवड समितीनेच कर्णधारपदासाठी बाबरचे नाव सुचविले. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) एकमताने बाबरच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले. एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघांचे बाबर नेतृत्व करेल, असे ‘पीसीबी’चे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी सांगितले.
हेही वाचा >>> मियामी खुली टेनिस स्पर्धा : बोपण्णा-एब्डेन जोडीला विजेतेपद
गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकातील अपयशानंतर बाबरने तिन्ही प्रारुपांतील पाकिस्तान संघाचे कर्णधारपद सोडले होते. नक्वी यांची ‘पीसीबी’च्या अध्यक्षपदी निवड झाल्यापासून कर्णधारपदासाठी बाबरचे नाव पुन्हा चर्चेत आले. मात्र, कर्णधारपदाचा कालावधी निश्चित असावा आणि कसोटी संघाचे नेतृत्वही माझ्याकडेच सोपवण्यात यावे अशी अट बाबरने घातली होती. परंतु, सध्या केवळ मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी निर्णय घेण्यात आल्याचे नक्वी यांनी स्पष्ट केले आहे. कसोटीसंदर्भातील निर्णय नंतर घेण्यात येईल. सध्या शान मसूद कसोटी संघाचा कर्णधार आहे.