भारतात एकीकडे आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचा थरार रंगला असून तिकडे पाकिस्तानमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेदरम्यान पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझमने मोठी कामगिरी करुन दाखवली आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तब्बल ४००० धावा केल्या असून भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीलाही मागे टाकले आहे.
बाबर आझमने रचला नवा विक्रम
पाकिस्तानी फलंदाज बाबर आझम एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात चार हजार धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. आझमने एकूण ८२ डावांमध्ये हा विक्रम रचला आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या हसीम आमलाने ८१ डावांमध्ये ४००० धावा केलेल्या असून तो या विक्रमामध्ये प्रथम क्रमांकावर आहे.
विराट कोहलीलाही मागे टाकलं
बाबर आझमने ४००० धावा करण्याच्या विक्रमामध्ये विराट कोहलीलाही मागे टाकलं आहे. सर्वात जलद गतीने आणि कमी डावात ४००० धावांचा टप्पा गाठणारा विराट कोहली हा आशियातील पहिला खेळाडू होता. त्याने ९३ डावांत हा विक्रम आपल्या नावावर केलेला होता. मात्र आता आझमने अवघ्या ८२ डांवामध्ये ही किमया करुन दाखवली आहे. त्यामुळे आझमने या विक्रमाममध्ये कोहलीलाही मागे टाकलं आहे.