सध्याच्या घडीला जागतिक स्तरावरील क्रिकेटमध्ये बाबर आझम हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. पाकिस्तानचा कर्णधार असलेला बाबर हा एकदिवसीय सामने, टी-२० आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करत आहे. मात्र नुकत्याच पार पडलेल्या टी-२० आशिया चषक स्पर्धेमध्ये बाबरला त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. असं असलं तरी त्याच्या नेतृत्वाखाली संघ अंतिम सामन्यात पोहोचला. आता पाकिस्तानचा संघ मायभूमीमध्ये इंग्लंडविरोधात सात टी-२० सामने खेळणार आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी हे सामने होणार आहेत. दरम्यान यापूर्वीच बाबर एका वेगळ्याच कारणासाठी सोशल मीडियावर चर्चेत आहे. बाबरच्या कव्हर ड्राइव्हसंदर्भात पाकिस्तानच्या नववीच्या विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र विषयामध्ये एक प्रश्न विचारण्यात आला आहे. सध्या या प्रश्नाची सोशल मीडियावर चर्चा असून या प्रश्नाचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

पाकिस्तानमधील पत्रकार सिराज हसन यांनी सोशल मिडियावर यासंदर्भातील एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पुस्तकातील त्या पानाचा फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला आहे. यावर चाहतेही मजेदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. “बाबर आझमच्या कव्हर ड्राइव्हसंदर्भातील प्रश्न नवव्या इयत्तेच्या फिजिक्सच्या अभ्यासक्रमात आहे,” अशा कॅप्शनसहीत सिराज यांनी हा फोटो शेअर केला आहे. बाबर आझमने अमुक एका ताकदीने चेंडू टोलवला आणि चेंडूचं वजन १२० ग्रॅम असेल तर तो किती वेगाने सीमेरेषेपार जाईल? अशा आशयाचा हा प्रश्न आहे.

यावर एका चाहत्याने लिहिलं आहे, “पाकिस्तानच्या शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम चांगला आहे.” अन्य एकाने, “जर बाबारने हा प्रश्न वाचला तर त्याला कव्हर ड्राइव्ह मारता येणार नाही” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर तिसऱ्याने या प्रश्नाचं उत्तर पाठ करुन ठेवा असा विद्यार्थ्यांना सल्ला दिला आहे. काहींनी यावरुन टीकाही केली आहे. काहींनी तर याचं उत्तर बाबर आझमलाही येणार नाही अशाही प्रतिक्रिया नोंदवल्यात.

बाबार आझमने टी-२० आशिया चषक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली नाही. ३० ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या ठरली. अंतिम सामन्यात त्याला केवळ पाच धावा करता आल्या. भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने केवळ १० धावा केल्या होत्या. पुढील पाच सामन्यांमध्ये त्याने ९, १४, ०, ३० आणि ५ अशा धावा केल्या. पाकिस्तानचा संघ अंतिम सामन्यात पोहोचला. मात्र श्रीलंकेने २३ धावांनी त्यांच्यावर मात करत आशिया चषक सहाव्यांदा जिंकला. २०१२ पासून पाकिस्तानला एकदाही आशिया चषक जिंकता आलेला नाही.

बाबर मागील बऱ्याच काळापासून टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकाचा फलंदाज राहिला आहे. त्याने ८० टी-२० सामन्यामध्ये ४२ च्या सरासरीने २७५४ धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि २६ अर्धशतकांचा समावेश आहे.

Story img Loader