IND vs PAK In ICC World Cup 2023 Semi Finals: आयसीसी विश्वचषक २०२३ स्पर्धा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. भारत सध्या पॉईंट टेबलमध्ये सर्वोच्च स्थानी आहे त्यामुळे भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित आहे. पाकिस्तानच्या सलग दोन विजयांनंतर आता पाकिस्तान सुद्धा उपांत्य फेरी गाठणार का आणि असं झालं तर पुन्हा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार का, याविषयी क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने अद्याप उपांत्य फेरीत जागा मिळवलेली नाही. परंतु आगामी सामन्यांमध्ये अफगाणिस्तान आणि बांग्लादेश यांच्यासमोर उपांत्य फेरी गाठण्याच्या दोन संधी ऑस्ट्रेलियाकडे आहेत. यापैकी एकाही सामन्यातील विजयामुळे ऑस्ट्रेलिया लीग टप्प्यात पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवू शकते.
चौथ्या स्थानासाठी आता न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात स्पर्धा आहे. चौथ्या स्थानी असलेला संघ उपांत्य फेरीत भारताविरुद्ध लढणार आहे. आता हे स्थान पाकिस्तानला मिळण्यासाठी खालीलपैकी एक समीकरण जुळून येणे आवश्यक आहे.
समीकरण १
जर न्यूझीलंड संघ श्रीलंकेकडून पराभूत झाला आणि पाकिस्तानने इंग्लंडला हरवले, तर पाकिस्तान दहा गुणांसह न्यूझीलंडच्या पुढे जाईल. ही स्थिती आणखी मजबूत करण्यासाठी, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला हरवण्याची आवश्यकता आहे, ज्यामुळे अफगाणिस्तानला दहा गुणांचा टप्पा गाठण्यापासून रोखता येईल.
समीकरण २
न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला आणि पाकिस्तानने इंग्लंडवर विजय मिळवला, तर अफगाणिस्तान दोन्ही सामने गमावेल. यामुळे चौथ्या उपांत्य फेरीसाठीची स्पर्धा पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील निव्वळ धावगतीनुसार निश्चित केली जाईल. न्यूझीलंडच्या निव्वळ धावगतीला मागे टाकण्यासाठी पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध मोठ्या फरकाने विजय सुनिश्चित करावा लागेल. मात्र, अफगाणिस्तानने त्यांच्या उर्वरित दोन सामन्यांपैकी किमान एक जिंकला तर त्यांचे दहा गुण होतील. मात्र तरीही पाकिस्तान नेट रन रेटच्या बाबतीत पुढे असल्याने अफगाणिस्तानला मागे टाकू शकेल.
हे ही वाचा<< “मैदानात भारतीय ध्वजाची विटंबना..”, सुनील गावसकरांनी सांगितलं श्रेयस अय्यरला एकही प्रश्न न विचारण्याचं कारण
समीकरण ३
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला आणि पाकिस्तानने इंग्लंडवर विजय मिळवला तर दोन्ही संघ दहा गुणांपर्यंत पोहोचतील. याशिवाय, अफगाणिस्तानने एकही विजय नोंदवला तर त्यांचेही दहा गुण होतील. अशा परिस्थितीत, नेट रन रेट (NRR) हा सेमी-फायनल क्वालिफायरसाठी निर्णायक घटक असेल. पाकिस्तानचा नेट रन रेट उत्तम असल्याने पाक संघाला मदत होऊ शकते. मात्र, जर पाकिस्तान आणि न्यूझीलंड दोघांच्या शेवटच्या सामन्यांवर पावसाचा परिणाम झाला तर न्यूझीलंड त्यांच्या NRR मुळे उपांत्य फेरीत पोहोचेल.