टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान क्रिकेट संघाचा विजय रथ गुरुवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध थांबला. पाकिस्तानने विजयासाठी दिलेले १७७ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने १९ षटकांत ५ गडी शिल्लक असताना पूर्ण केले. मॅथ्यू वेडने १९व्या षटकातील शेवटच्या तीन चेंडूंवर शाहीन आफ्रिदीविरुद्ध सलग तीन षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला. मॅथ्यू वेड १७ चेंडूत ४१ आणि मार्कस स्टॉइनिस ३१ चेंडूत ४० धावा करून नाबाद राहिला. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी ४१ चेंडूत ८१ धावांची भागीदारी झाली.

पराभवानंतर बाबर आझमने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ”आम्ही ज्या पद्धतीने सुरुवात केली ती आमच्या योजनेनुसार होती. आम्हीही चांगली जमवाजमव केली पण आज आमची गोलंदाजी तितकीशी अचूक नव्हती आणि अशा प्रसंगी तुम्ही झेल सोडले तर सामना असाच पालटू शकतो. तो झेल घेतला असता तर परिस्थिती वेगळी असती, कारण त्यानंतर नवा फलंदाज आला असता तर निकाल वेगळा लागला असता. एक खेळाडू म्हणून तुम्हाला नेहमी सतर्क राहावे लागते.”

हेही वाचा – T20 WC: पाकिस्तानचा उपांत्य फेरीत पराभव आणि सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; नेटकरी म्हणाले…

विश्वचषक स्पर्धेतील संघाच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करताना बाबर म्हणाला, “आम्ही ज्या प्रकारे संपूर्ण स्पर्धा खेळली ते कौतुकास्पद आहे. आगामी काळात संघाकडून आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. प्रत्येक खेळाडूने त्याला दिलेली भूमिका बजावली आहे. त्यामुळे एक कर्णधार म्हणून मी समाधानी आहे. आशा आहे की पुढच्या स्पर्धेसाठी आम्ही यातून शिकू. चाहत्यांनी ज्या प्रकारे आम्हाला पाठिंबा दिला तो खूप छान होता. आम्ही त्यांचे आभार मानतो.”

तो झेल…

ऑस्ट्रेलियाला १२ चेंडूत २२ धावांची गरज असताना पाकिस्तानकडून १९वे षटक वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीने टाकले. या षटकात हसन अलीने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मॅथ्यू वेडचा झेल सोडला. पुढच्या तीन चेंडूवर वेडने लागोपाठ तीन षटकार ठोकत सामना आपल्या नावावर केला. या षटकात आफ्रिदीने २२ धावा खर्च केल्या. वेडने १७ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ४१ तर मार्कस स्टॉइनिसने २ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४० धावा ठोकल्या. पाकिस्तानकडून शादाब खानने २६ धावांत ४ बळी घेतले.

Story img Loader