Babar Azam recommended Imad Wasim to talk to Virat Kohli : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आपल्या खेळाने संपूर्ण जगात नाव कमावले आहे. कोहली हा क्रिकेट जगतातील अव्वल फलंदाजांपैकी एक आहे. दुसरीकडे, पाकिस्तान क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार बाबर आझमनेही गेल्या काही वर्षांपासून एक महान फलंदाज म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. पण हे दोन स्टार खेळाडू पहिल्यांदा कधी, कसे आणि कुठे भेटले होते? याबद्दल टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने खुलासा केला आहे.
‘स्टार स्पोर्ट्स’वर बोलताना विराट कोहलीने सांगितले की, २०१९ च्या विश्वचषकादरम्यान भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर मी बाबर आझमला पहिल्यांदा भेटलो होतो. याशिवाय पहिल्या भेटीत दोघांमध्ये काय संभाषण झाले ते त्यांनी सांगितले. विराट कोहली म्हणाला, “माझे त्याच्याशी (बाबर आझम) पहिले संभाषण २०१९ च्या विश्वचषकादरम्यान मँचेस्टरमधील सामन्यानंतर झाले होते.”
विश्वचषक २०१९ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर बाबर आझम आणि विराट कोहली यांची पहिली भेट झाली होती. मॅचनंतर बाबर स्वतः विराटकडे आला नव्हता. त्याने सहकारी खेळाडू इमाद वसीमला विराट कोहलीशी बोलायच आहे, असे सांगितले होते. विरा कोहली म्हणाला, “मी इमादला अंडर-१९ विश्वचषकापासून ओळखतो आणि बाबरला माझ्याशी बोलायचे आहे, असे तो म्हणाला. त्यानंतर आम्ही बसलो आणि खेळाबद्दल चर्चा केली. पहिल्या दिवसापासून मी त्याच्यामध्ये खूप आदर पाहिला आणि तो बदलला नाही.”
हेही वाचा – Tabrez Shamsi: बाबर आझमच्या टिकाकारांना तबरेझ शम्सीचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, “पन्नासची सरासरी असणे हा…”
आशिया चषक स्पर्धेत विराट आणि बाबर येणार आमनेसामने –
पुढील महिन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने होऊ शकतात. २ सप्टेंबरला आशिया चषकात दोन्ही संघ भिडणार आहेत. १० सप्टेंबर रोजी आशिया चषकाच्या सुपर-४ मध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडू शकतात. दोघेही अंतिम फेरीत पोहोचले तर आणखी एक लढत होईल.
हेही वाचा – विराट कोहलीने चाहत्याला दिला पुढच्या वेळी सेल्फी देण्याचा शब्द, VIDEO होतोय व्हायरल
विराट आणि बाबरची आतापर्यंतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द –
विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ५०१ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या ५५९ डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने ५३.६३ च्या सरासरीने २५५८२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ७६ शतके आणि १३१ अर्धशतके झळकली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या २४५* धावा आहे. त्याचबरोबर बाबर आझमने आतापर्यंत २५३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या २८४ डावांमध्ये त्याने ४९.५८ च्या सरासरीने १२३४६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३० शतके आणि ८२ अर्धशतके झळकावली, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या १९६ धावा आहे.