Babar Azam Retirement Post Viral: पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना रावळपिंडी येथे खेळवला गेला. या सामन्यात बांगलादेशने ६ विकेट्सने विजय मिळवत पाकिस्तानचा दारूण पराभव केला. या विजयासह बांगलादेशने ही कसोटी मालिका २-० च्या फरकाने एकतर्फी जिंकली आहे. घरच्या मैदानावर झालेल्या या पराभवाने पाकिस्तानला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान बाबर आझमने कसोटीमधून निवृत्ती जाहीर केल्याची एक पोस्ट व्हायरल झाली आहे.
बाबर आझमच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची पोस्ट खूप वेगाने व्हायरल होत आहे. खरं तर बाबर आझमची कसोटी क्रिकेटमध्ये खराब कामगिरी सुरूच आहे. बांगलादेशविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये बाबरने आपल्या फलंदाजीने चाहत्यांना आणि संघाला निराश केले आहे. त्यानंतर आता त्यांचे निवृत्तीची पोस्ट समोर येत आहे. पण ही निवृत्तीची पोस्ट खोटी आहे.
हेही वाचा – Bangladesh beat Pakistan by 6 Wickets: पाकिस्तान चारीमुंड्या चीतपट; बांगलादेशचा ऐतिहासिक मालिका विजय
बाबर आझमच्या पॅरोडी अकाऊंटवरून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. ज्यामध्ये बाबर आझमची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्याचे म्हटले होते. काही वेळातच ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. ही अफवा खोटी असून बाबरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली नाही. मात्र, या पोस्टमुळे पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमने कसोटी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी चर्चा रंगली आहे. बांगलादेश-पाकिस्तान यांच्यातील कसोटी सामना सुरू असतानाच ही पोस्ट व्हायरल झाली होती.
कसोटीत बाबरची बॅट शांत
बाबर आझमची बॅट कसोटी क्रिकेटमध्ये तळपताना पाहायला मिळालेली नाही. बाबरने गेल्या १६ डावांमध्ये एकही अर्धशतक झळकावलेले नाही. बाबरने बांगलादेशविरुद्धही निराशाजनक फलंदाजी केली. पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात बाबर आझम आपले खाते उघडू शकला नाही तर दुसऱ्या डावात २२ धावा करून तो परतला. तर दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात ३१ धावा केल्यानंतर दुसऱ्या डावात केवळ ११ धावा करून तो बाद झाला. अशा कामगिरीनंतर चाहत्यांनी त्याच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचे एक पत्र पोस्ट केले आणि त्यामध्ये त्याच्या स्वाक्षरीच्या जागी अंगठा दिला आहे.