PAK vs AFG World Cup Match Today: चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर वर्ल्ड कप २०२३ मधील २२ व्या सामन्यात पाकिस्तानचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. भारत व ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग दोन पराभव झाल्याने आजचा सामना पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानचा ६२ धावांनी पराभव झाला होता तर भारतासमोरही पाकिस्तानचा खेळ गुंडाळला गेला होता. सध्या विश्वचषकाच्या पॉईंट टेबलमध्ये २ विजय व २ पराभवांसह पाकिस्तान पाचव्या स्थानी आहे.
दुसरीकडे, अफगाणिस्तानने या मोहिमेत फक्त एकच सामना जिंकला आहे. अफगाणिस्तानला त्यांच्या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडकडून 149 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध विजयासाठी अफगाणिस्तान सुद्धा पुरेपूर प्रयत्न करणार हे निश्चित आहे. दोन्ही संघांसाठी महत्त्वाच्या या सामन्याआधी आता पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजा याने युट्युबवर बोलताना बाबर आझम व संघाला तंबी दिली आहे.
रमिझ राजा याने म्हटले की, अफगाणिस्तानचे फिरकी गोलंदाज चेन्नईमध्ये पाकिस्तानला विजयी होण्यात मोठा अडथळा ठरू शकतात. आजच्या सामन्यात काहीही होऊ शकते. जर पाकिस्तानी फलंदाजांनी फिरकीपटूंची कामगिरी लक्षात, अभ्यासपूर्ण शॉट्स खेळले तर विजयाची आशा आहे अन्यथा पाकिस्तानला आपले स्थान टिकवून ठेवणं खूप कठीण होईल.”
तर स्टार स्पोर्ट्स वर बोलताना ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभवाबाबतही राजाने शाळा घेतली. तो म्हणाला की, “झेल सोडण्याची शिक्षा पाकिस्तानला भोगावी लागत आहे. आम्ही आजपर्यंत एका झेल सोडल्याचे परिणाम पाहिले आहेत पण त्यामुळे १५०-१६० धावांचा फटका बसणं ही खूप मोठी शिक्षा आहे. त्यामुळे आता पाकिस्तानी संघाला जाग यायला हवी, जोपर्यंत तुम्ही झेल पकडत नाही नाही तोपर्यंत तुम्हाला शिक्षा होत राहील.”
IND vs NZ नंतर पॉईंट टेबल कसा दिसतोय हे पाहण्यासाठी इथे करा क्लिक
भारत विरुद्ध पाकिस्तान प्रमाणेच अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान हा सामना सुद्धा प्रचंड चर्चेत असण्याचे एक कारण म्हणजे हे दोन्ही संघ एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून आजवर एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन्ही संघ सात वेळा आमने सामने आले आहेत आणि पाकिस्तानने सातही वेळा विजय मिळवला आहे. आजच्या सामन्यात पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानवर सर्वांच्या नजरा असतील कारण कामरान अकमल, मोईन खान आणि सरफराज अहमद नंतर २००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा चौथा पाकिस्तानी यष्टिरक्षक बनण्यापासून तो अवघ्या १३ धावा दूर आहे. तर मुजीब उर रहमानला १०० वनडे विकेट्स पूर्ण करण्यासाठी तीन विकेट्स हवे आहेत.