Babar Azam troll by fan video viral : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार बाबर आझम त्याच्या खराब फॉर्ममधून अद्याप सावरू शकलेला नाही. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी, बाबर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या तिरंगी मालिकेसाठी पाकिस्तानच्या संघाचा भाग आहे. मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडसोबत खेळला गेला. या सामन्यात बाबर आझम फखर झमानसोबत ओपनिंग करण्यासाठी आला, पण तो फक्त १० धावा करून बाद झाला. अशा परिस्थितीत बाबर आझम पुन्हा एकदा फ्लॉप झाला.
चाहत्याकडून बाबर आझमवर टीका –
फलंदाजीतील फ्लॉप शोनंतर चाहत्यांनी बाबरला आपले लक्ष्य बनवले. पाकिस्तानचा न्यूझीलंड विरुद्धचा पहिला सामना पाहण्यासाठी गद्दाफी स्टेडियमवर मोठी गर्दी झाली होती. स्टेडियममधील एका चाहत्याने बाबर आझमची खिल्ली उडवत व्हिडीओ बनवला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. या व्हायरल व्हिडिओमध्ये चाहते त्याला झिम्बाबर म्हणत असल्याचे दिसत आहे. शिवाय, एक पोलिस अधिकारीही त्याच्या समोर बसून सामना पाहत होता.
पाकिस्तान संघात बाबरला म्हटले जाते किंग –
एक काळ असा होता, जेव्हा बाबर आझम पाकिस्तानसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घालत होता. एवढेच नाही तर तो संघाचा कर्णधारही होता. याच कारणास्तव बाबर आझमला पाकिस्तान संघाचा किंग देखील म्हटले जात असे, परंतु फलंदाजीत सतत अपयशी ठरल्यामुळे त्याला केवळ कर्णधारपदच गमवावे लागले नाही, तर संघातील त्याचे स्थानही धोक्यात आले आहे. हेच कारण आहे की किंग या नावावरुन चाहते त्याची खिल्ली उडवत असतात.
बाबरच्या खराब फॉर्मनंतरही पाकिस्तान क्रिकेट संघ त्याच्यावर विश्वास दाखवत आहे. याशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी त्याच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खरंतर, बाबर आझम आता पाकिस्तानसाठी सलामीवीराच्या भूमिकेत दिसणार आहे. सॅम अयुब जखमी झाल्यामुळे बाबरवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. म्हणूनच बाबर आझम आता संघासाठी सलामीला येईल.