Pakistan Captain Babar Azam Fine : भारतात होणाऱ्या विश्वचषकाच्या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघही सज्ज झाला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वात बुधवारी भारतात येणार आहे. मात्र पाकिस्तान टीमचा कर्णधार बाबर आझमला वाहतूक पोलिसांनी आर्थिक दंड ठोठावला आहे. ऑडी चालवत असताना आठवड्यात दोनदा दंड मोडल्याने पाकिस्तानी क्रिकेटपटून बाबर आझमला पोलिसांनी खडे बोल सुनावले आहेत. लाहोर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तसंच त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना म्हणजेच लायसन्सही नव्हतं त्यामुळे पोलिसांनी त्याला चांगलंच झापलं आहे. बाबर आझमचा पोलिसांबरोबरचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्याला ट्रोल केलं जातं आहे.
नेमकं काय घडलं?
पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार पांढऱ्या रंगाच्या ऑडीतून बाबर आझम हायवेने जात होता. त्यावेळी त्याने ओव्हरस्पिडिंग केलं तसंच वाहतुकीचे नियमही मोडले. लेनची शिस्तही त्याने पाळली नाही. पोलिसांनी त्याची गाडी अडवली आणि त्याच्याकडे लायसन्सची विचारणा केली. मात्र त्याच्याकडे लायसन्सही नसल्याचं समोर आलं. ज्यानंतर वाहतूक पोलिसांनी त्याला झापलं आणि त्याला आर्थिक दंडही भरावा लागला. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या खेळाडूंना भारतीय व्हिसा देण्यात आला आहे.
बाबर आझमविरोधात कारवाईची ही पहिली वेळ नाही
बाबर आझमविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्याच्याविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली होती. योग्य नंबर प्लेट नसल्याने यापूर्वी बाबर आझमच्या विरोधात कारवाई करण्यात आली होती. नंबर प्लेट ही निर्धारित नियमांप्रमाणे नसून हे कायद्याचं उल्लंघन आहे असं बाबरला यावेळेस पोलिसांनी सांगितलं होतं. बाबरच्या सुदैवाने त्यावेळी पोलिसांनी त्याला दंड ठोठावला नव्हता. मात्र नुकत्याच झालेल्या कारवाईमध्ये बाबरने वाहतुकीसंदर्भातील नियम मोडल्याने केवळ समज देऊन त्याला सोडण्यात आलं नाही. त्याच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसंच त्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याला चांगलंच ट्रोल केलं जातं आहे.