Babar Azam Tweet For Virat Kohli Goes Viral: पाकिस्तान क्रिकेट सध्या क्रिकेट जगतात चर्चेचा विषय ठरलं आहे. पाकिस्तानला बांगलादेशविरूद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर इंग्लंड कसोटीत मोठी धावसंख्या उभारूनही संघाला पराभव पत्करावा लागला. या पराभवाचं खापर पाकिस्तान संघासह स्टार खेळाडू बाबर आझम याच्या डोक्यावरही फोडलं गेलं, कारण बाबरने गेल्या ४ डावांमध्ये फक्त ७० धावा केल्या आहेत. बाबर सध्या त्याच्या कारकीर्दीतील खराब फॉर्ममधून जात आहे परिणामी त्याला आता कसोटी संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. याच प्रकरणावरून सोशल मीडियावर बाबर आझमचं विराट कोहलीसाठी केलेलं जुनं ट्विट व्हायरल होत आहे आणि चाहते कोहलीकडेही बाबरसाठी ट्विट करण्याची मागणी करत आहेत.
बाबर आझम आज त्याचा ३०वा वाढदिवस साजरा करत आहे. तर आजच इंग्लंडविरूद्ध पाकिस्तानचा दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. पण खराब फॉर्ममधून जात असलेल्या बाबर आझमला या कसोटी सामन्यासाठी संघातून वगळण्यात आले आहे. याचदरम्यान सोशल मीडियावर चाहते विराट कोहलीकडेही बाबरसाठी ट्विट करावं अशी मागणी करत आहेत. २०२२ मध्ये जेव्हा विराट कोहली खराब फॉर्ममधून जात होता, तेव्हा बाबरने त्याच्यासाठी ट्विट केलं होतं.
बाबर आझमच्या चाहत्यांनी विराट कोहलीकडे बाबरला पाठिंबा देण्याची केली मागणी
बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर बाबर आझमने पुढच्या डावात २२ धावा केल्या आणि दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात ३१ धावा केल्या कदाचित बाबर आझम दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती, पण तो केवळ ११ धावा करून बाद झाला. अशा प्रकारे ४ डावात केवळ ६४ धावा त्याने केल्या. त्यामुळे पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी बाबर आझमच्या फॉर्मवर टीका केली, मात्र चाहत्यांनी विराट कोहलीला बाबर आझमला प्रोत्साहन देण्याची विनंती केली आहे.
हेही वाचा – PAK vs ENG : पाकिस्तानने दुसरी कसोटी जिंकण्यासाठी आखला नवा डावपेच, खेळपट्टीबाबत घेतला मोठा निर्णय
२०२२ मध्ये विराट कोहली खराब फॉर्ममधून जात होता आणि या काळात बाबर आझमने कोहलीला या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्याने पोस्ट करत लिहिले की, “हेही दिवस निघून जातील.” यावर विराट कोहलीची प्रतिक्रियाही आली होती. विराटने त्याचे आभार मानले होते. २०२२ मध्ये विराट इंग्लंड दौऱ्यावर वनडे सामन्यांमध्ये १६ आणि १७ धावा केल्या होत्या आणि टी-२० सामन्यांमध्ये विराट कोहली १ आणि ११ धावा करून बाद झाला होता. बाबर आझमच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर बाबरचे विराट कोहलीसाठीचे ट्विट रिपोस्ट करत विराटला विनंती केली आहे. ज्याचे अनेक ट्विटही व्हायरल होत आहेत.