Babar Azam on IND vs PAK match: आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने २ सप्टेंबर रोजी आशिया चषक २०२३च्या भारत-पाकिस्तान ब्लॉकबस्टर सामन्यापूर्वी मोठे वक्तव्य केलं आहे. शनिवारी स्टार स्पोर्ट्सने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाकिस्तानच्या कर्णधाराने सांगितले की, “हा सामना नेहमीच प्रतिस्पर्धी संघासाठी रोमांचक आणि चाहत्यांना आनंद देणारा असतो. दोन्ही संघाच्या खेळाडूंवर सारखाच दबाव असतो. कोणता संघ जिंकेल हे या सामन्याबाबत कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे खेळाडू तसेच संपूर्ण जगाने त्याचा आनंद घेतला पाहिजे.”
स्टार स्पोर्ट्सवर बाबर पुढे म्हणाले, “भारत-पाकिस्तान सामने नेहमीच अटीतटीचे राहिले आहेत. या हायव्होल्टेज सामन्यांचे संपूर्ण जग आनंद घेते आणि आम्ही पण मैदानात खूप एन्जॉय करत असतो. माझ्या मते भारत-पाकिस्तान सामन्यावरून क्रिकेटचा दर्जा खूप चांगला आणि स्पर्धात्मक आहे, हे दिसून येते. भारत-पाकिस्तान ज्या-ज्या वेळी होतो त्याची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात कारण, दोन्ही संघ नेहमीच १०० टक्के परफॉर्मन्स देतात. नेहमीच प्रतिस्पर्धी संघबरोबर खेळायला मजा येते.”
पाकिस्तानने नुकतीच अफगाणिस्तानविरुद्धची मालिका ३-०ने जिंकली. आता पाकिस्तान जगातील क्रमांक १चा वन डे फॉरमॅटमधील संघ झाला असून त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे आयसीसी क्रमवारीतील हा ताज घेऊन ते आशिया चषक २०२३मध्ये खेळायला उतरतील. शेवटच्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने २६८ धावांचे लक्ष्य ठेवले होते आणि प्रत्युत्तरात अफगाण संघ २०९ धावांवर गारद झाला.
बाबर आझम सध्या पहिल्या क्रमांकावर आहे
बाबर आझम सध्या एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे फॉर्ममध्ये असणाऱ्या पाकिस्तान संघाला हरवणे एवढे सोपे होणार नाही. ते नक्कीच ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करतील कारण, मागील आवृत्तीत ते अंतिम फेरीत श्रीलंकेकडून पराभूत झाले होते.
आशिया चषकाची सुरुवात ३० ऑगस्ट रोजी पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील सामन्याने होणार आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर फोरमध्ये प्रवेश करतील. या टप्प्यातील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे संघ १७ सप्टेंबरला अंतिम सामना खेळतील. ब गटात बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. भारताचा अ गटातील पहिला सामना २ सप्टेंबरला पल्लेकेले येथे पाकिस्तानशी होणार असून त्यानंतर ४ सप्टेंबरला त्यांचा नेपाळशी सामना होणार आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पीसीबीचे निमंत्रण स्वीकारले आहे. वृत्तानुसार, तो पाकिस्तानमध्ये होणारे सामनेही पाहणार आहे. पीटीआयने एका सूत्राचा हवाला देत आपल्या वृत्तात म्हटले आहे की, बीसीसीआयचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव जय शाह २ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान सामन्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहतील. यानंतर बिन्नी आणि राजीव पाकिस्तानला जाणार आहेत.
आशिया कप २०२३ साठी भारतीय संघाचा संघ
रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, विराट कोहली, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, इशान किशन (यष्टीरक्षक), के.एल. राहुल (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर.