दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेव्हिसने आयसीसी अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आपला ठसा उमटवला आहे. ‘बेबी एबी डिव्हिलियर्स’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या ब्रेव्हिसने या स्पर्धेत चार सामन्यांत ३६२ धावा केल्या. तो या स्पर्धेच्या साखळी टप्प्यात सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही आहे. ब्रेव्हिसच्या खेळण्याच्या शैलीची तुलना एबी डिव्हिलियर्सशी केली जात आहे. अनेक लोक त्याला बेबी एबी नावाने हाक मारतात.
डेवाल्ड ब्रेव्हिसने आयपीएल २०२२च्या मेगा ऑक्शनसाठी आपल्या नावाची नोंदणी केली आहे. तो आयपीएल फ्रेचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाचा मोठा चाहता आहे. विराट कोहली आणि देशबांधव एबी डिव्हिलियर्स हे आवडते खेळा़डू असल्याने ब्रेव्हिस आरसीबी संघात जातो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
हेही वाचा – ‘पुष्पा फिवर’ आणि काय..! अफगाणिस्तानचा राशिद खानही झाला फॅन; VIDEO पोस्ट करत लावली आग!
आयसीसीने आपल्या वेबसाइटवर ब्रेव्हिसचा एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये तो म्हणाला, ”प्रोटीज संघासाठी खेळणे हे माझे सर्वात मोठे स्वप्न आहे आणि त्यानंतर मी आयपीएलचा मोठा चाहता आहे. मला आरसीबीकडून खेळायला आवडेल कारण एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली तिथे असतील.”
एबी डिव्हिलियर्सचा पर्याय शोधत असलेल्या आरसीबीसाठी ही आनंदाची बातमी आहे. मागील आयपीएल हंगामानंतर डिव्हिलियर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.