अल्पावधीत भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून नाव कमावलेल्या जसप्रीत बुमराहने आज वयाच्या २७ वर्षात पदार्पण केलं आहे. सध्या बुमराह दुखापतीमुळे संघाबाहेर असला, तरीही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाकने बुमराहला ‘बच्चा बॉलर’ म्हणून हिणवलं होतं. यानंतर भारतीय खेळाडूंनी रझाकवर चांगलच तोंडसुख घेतलं.
आता जसप्रीत बुमराहचा आयपीएलमधील संघ मुंबई इंडियन्स त्याच्या मदतीसाठी धावून आला आहे. जसप्रीतच्या वाढदिवसाचं निमीत्त साधत मुंबई इंडियन्सने, रझाकने केलेल्य टिकेचा संदर्भ घेत बुमराहला शुभेच्छा दिल्या आहेत. Baby Bowler to a World-Beater अशी कॅप्शन देत मुंबईने रझाकला भन्नाट प्रत्युत्तर दिलं आहे.
From a ‘baby bowler’ to a world-beater #BoomBoozled #OneFamily #CricketMeriJaan #MumbaiIndians @Jaspritbumrah93 pic.twitter.com/aIj447ucpc
— Mumbai Indians (@mipaltan) December 6, 2019
रझाकने काय उधळली होती मुक्ताफळं?
“मी जेव्हा क्रिकेट खेळायचो, तेव्हा माझ्यासमोर जगातील सर्वोत्तम गोलंदाज गोलंदाजी करायचे. मी भल्या-भल्या गोलंदाजांसमोर फलंदाजी केली आहे. त्यामुळे बुमराहचे कौतुक मला सांगू नका. जर तो माझ्यावेळी गोलंदाजी करत असता, तर कामगिरीचे दडपण त्याच्यावर असते. मी तर त्याची गोलंदाजी सहज ठोकून काढली असती. मी माझ्या काळात ग्लेन मॅकग्रा आणि वसीम अक्रम यांच्या सारख्या गोलंदाजांसमोर खेळलो आहे. माझ्यासाठी बुमराह एकदम ‘बच्चा’ आहे”, अशी दर्पोक्ती अब्दुल रझाकने केली होती.
“जसप्रीत बुमराह हा सध्याच्या घडीला खूप चांगली कामगिरी करताना दिसतो आहे. त्याने स्वत:मध्ये प्रचंड सुधारणा केली आहे. त्याची गोलंदाजीची शैली काहीशी विचित्र आणि वेगळी आहे. त्यातच चेंडूच्या सीमचा (शिवणीचा) योग्य वापर कसा करावा हे त्याला ठाऊक आहे. त्यामुळेच तो खूप परिणामकारक गोलंदाज ठरतो. पण मी माझ्या काळात अनेक प्रतिभावान आणि वेगवान गोलंदाजांचा सामना केला आहे. त्यामुळे माझ्या वेळी बुमराह असता, तर मला गोलंदाजी करताना बुमराहवरच दडपण आले असते. मी त्याच्या गोलंदाजीवर सहज चौकार-षटकार खेचले असते, असे रझाक म्हणाला होता.