प्राणघातक हल्ल्याचा शिकार ठरलेला न्यूझीलंड संघाचा फलंदाज जेसी रायडर हल्ल्यातून सावरल्यानंतर मैदानावर परतण्याची आतुरतेने वाट पाहत होता आणि त्याची ही इच्छा आता लवकरच पुर्ण होण्याची चिन्हे आहेत. रायडर पुर्णपणे बरा झाला असून तो लवकरच आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल असे जेसी रायडरच्या व्ययक्तीक व्यवस्थापकाने स्पष्ट केले आहे.
२८ वर्षीय रायडरवर ख्राइश्चर्चमधील एका बारबाहेर हल्ला झाल्यानंतर त्याच्या डोक्याला आणि फुप्फुसाला जबर दुखापत झाली होती. अत्यंत चिंताजनक स्थितीत त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. चिंताजनक प्रकृतीत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जेसी रायडर कोमात होता. परंतु जेसीने दुर्दम्य इच्छाशक्ती, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर झालेल्या दुखापतीवर मात केली आणि कोमातून बाहेर पडल्यानंतर रायडरटच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. जेसी लवकरच आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्यास पुर्णपणे सज्ज होईल. फक्त काही बाबींशी जुळवून घेण्याचा सराव जेसी करत आहे. त्यानंतर तो नक्की संघात पुनरागमन करेल असा विश्वास रायडरचे व्यवस्थापक आरोन क्ली यांनी व्यक्त केला आहे.