आंतरराष्ट्रीय खेळाडूला एखाद्या स्पर्धेदरम्यान शिस्तभंग केल्याप्रकरणी किंवा खराब प्रदर्शनाच्या कारणास्तव दौऱ्यातून माघारी बोलाविले जाते मात्र आगामी दौऱ्यापूर्वी पुरेशी विश्रांती मिळावी यासाठी खेळाडूला ‘परत फिरा रे’चा आदेश मिळणे हा अपवादच. परंतु दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेमधून माघार घेऊन मायदेशी परतण्याचा आदेश ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाकडून अष्टपैलू शेन वॉटसनला मिळण्याची शक्यता आहे.   
नुकत्याच श्रीलंकेत झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात वॉटसनने शानदार अष्टपैलू प्रदर्शन करीत मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता. यानंतर लगेचच तो चॅम्पियन्स लीग स्पर्धेत सिडनी सिक्सर्सकडून खेळण्यासाठी आफ्रिकेला रवाना झाला. ऑस्ट्रेलियन संघाला पुढील महिन्यांत आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. वॉटसन ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने महत्त्वाचा खेळाडू आहे. वॉटसनला सातत्याने भेडसावणाऱ्या दुखापतींच्या समस्या लक्षात घेऊन आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त असणे ऑस्ट्रेलियासाठी आवश्यक आहे. यामुळेच क्रिकेट ऑस्ट्रेलिया हा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.
या निर्णयामुळे सिडनी सिक्सर्स संघाचे व्यवस्थापन नाराज होण्याची शक्यता आहे. वॉटसन यॉर्कशायरविरुद्ध आणि हायवेल्ड लायन्सविरुद्ध मंगळवारी होणारा सामनाच खेळू शकतो. मात्र उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यामध्ये तो उपलब्ध होऊ शकणार नसल्याने सिडनी सिक्सर्सपुढील चिंता वाढल्या आहेत. पुढच्या सोमवारी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यासाठी वॉटसन उपलब्ध राहणार नसल्याने सिडनी सिक्सर्सच्या पुढील फेरीत आगेकूच करण्याच्या शक्यतांवरही परिणाम होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा