भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवण्यासाठी आपली बॅट आसुसली आहे, हेच युवराज सिंगने रविवारी दाखवून दिले. डावखुरा फलंदाज युवराजने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांविरुद्ध हल्लाबोल करत ‘अ’ दर्जाच्या क्रिकेटमधील १८ शतक साकारले आणि भारतीय संघाला मोठी धावसंख्या रचून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्याला युसूफ पठाणने अर्धशतक झळकावून शानदार साथ दिली. मग भारतीय गोलंदाजांनी या महत्त्वाकांक्षी पायावर कळस चढवला. त्यामुळे भारत ‘अ’ संघाने बंगळुरूला झालेल्या पहिल्या अनधिकृत एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिज ‘अ’ संघाविरुद्ध ७७ धावांनी दमदार विजय मिळवला.
पावसामुळे ४२ षटकांपर्यंत कमी करण्यात आलेल्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील या एकदिवसीय सामन्यात भारत ‘अ’ संघाने विजयासाठी ३१३ धावांचे आव्हान उभे केले. युवराजने फक्त ८९ चेंडूंत ८ चौकार आणि ७ षटकारांची बरसात करीत १२३ धावांची खेळी नेत्रदीपक खेळी साकारली. तथापि, पठाणने फक्त ३२ चेंडूंत ४ चौकार आणि आणि ६ षटकारांची आतषबाजी करीत नाबाद ७० धावा काढल्या. या जोडीने चौथ्या विकेटसाठी फक्त ५५ चेंडूंत १२५ धावांची भागीदारी रचली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या मनदीप सिंगनेही ७८ चेंडूंत ६७ धावा केल्या. त्याने ७ चौकार आणि एक षटकार ठोकला. त्याने युवीसोबत तिसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली.
३१ वर्षीय युवीने प्रारंभ धीम्या गतीने केला. ३९व्या चेंडूवर पहिल्यांदा चेंडू सीमापार धाडला आणि नंतर ६० चेंडूंत अर्धशतक साकारले. परंतु मग त्याने चौकार आणि षटकारांचा सपाटा लावताना फक्त २० चेंडूंत शतकाचा टप्पा पार केला. २०१३ या वर्षांत युवराजने हे पहिले शतक तब्बल २९ डावांनंतर साकारले. डिसेंबर २०१२मध्ये ग्वाल्हेर येथे पंजाबकडून मध्य प्रदेशविरुद्ध खेळताना त्याने १३१ धावांची खेळी उभारली होती.
त्यानंतर आर. विनय कुमार, युसूफ पठाण, राहुल शर्मा आणि सुमित नरवान या गोलंदाजांनी प्रत्येकी दोन बळी घेत विंडीजच्या धावसंख्येला लगाम घातला. त्यामुळे पाहुण्यांचा डाव ३९.१ षटकांत २३५ धावांत आटोपला. वेस्ट इंडिजकडून नरसिंग देवनारायणने ६३ चेंडूंत ५७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. त्याने आंद्रे फ्लेचर (२९) सोबत चौथ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी रचली. याचप्रमाणे अ‍ॅश्ले नर्सने ५० चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांसह ५७ धावा केल्या आणि अखेरच्या षटकांमध्ये मनोरंजन केले. नरवानने नर्सला बाद करून वेस्ट इंडिजच्या डावाला पूर्णविराम दिला.
संक्षिप्त धावफलक
भारत ‘अ’ : ४२ षटकांत ४ बाद ३१२ (मनदीप सिंग ६७, युवराज सिंग १२३, युसूफ पठाण ७०; आंद्रे रसेल १/७०) विजयी विरुद्ध वेस्ट इंडिज ‘अ’ : ३९.१ षटकांत सर्व बाद २३५ (नरसिंग देवनारायण ५७, आंद्रे फ्लेचर २९, अ‍ॅश्ले नर्स ५७; सुमित नरवाल २/२८, आर. विनय कुमार २/४२, राहुल शर्मा २/५७, युसूफ पठाण २/४७)
सामनावीर : युवराज सिंग.
चेंडू ८९, चौकार ८, षटकार ७, एकूण १२३

Story img Loader