माणूस कितीही मोठा झाला तरी त्याची कर्मभूमी आणि कर्मभूमीतील माणसांशी अतूट नाते जोडलेले असते. आपल्या लाडक्या खेळाडूला खेळताना पाहण्याची त्यांची अवीट इच्छा असते आणि जेव्हा त्याचा दोनशेवा ऐतिहासिक सामना असेल तर तो एक सामना न राहता सोहळाच होऊ शकतो. सध्या मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा दोनशेवा कसोटी सामना भारतात होणार असल्याचे निश्चित झाले असले तरी तो मुंबईला होणार की कोलकात्यामध्ये हे अजूनही ठरलेले नाही. पण हा सामना हा त्याच्या कर्मभूमीत म्हणजे मुंबईलाच व्हायला हवा, असे क्रिकेट क्षेत्रातील मान्यवरांना वाटते.
सचिनचा दोनशेवा कसोटी सामना हा फार मोठा क्षण आहे. सचिनने आतापर्यंत कामगिरीत सातत्य आणि तंदुरुस्ती राखल्यामुळे तो इथपर्यंत पोहचू शकला असून त्यालाही आपला दोनशेवा सामना मुंबईतच व्हावा असे वाटत असेल. सचिनने मुंबईला जगप्रसिद्ध केले आहे, मुंबईकरांचे त्याच्यावर मनापासून प्रेम आहे. त्यामुळे त्याचा दोनशेवा सामना मुंबईतच व्हायला हवा, असे वाटते. जर हा ऐतिहासिक सामना मुंबईत झाला तर साऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा होईल.
-चंद्रकांत पंडित, भारताचे माजी क्रिकेटपटू
एक क्रिकेटप्रेमी, मुंबईकर आणि एमसीएचा पदाधिकारी म्हणून मला वाटते की, सचिनचा दोनशेवा सामना मुंबईलाच व्हायला हवा. त्याचे पदार्पण पाकिस्तानात झाले. शंभरावा सामना इंग्लंडला झाला, महाशतक बांगलादेशला झाले, त्यामुळे आता त्याचा दोनशेवा सामना भारतात होणार असेल तर तो मुंबईलाच व्हायला हवा. बीसीसीआयने आम्हाला ही संधी द्यायला हवी, अशी मनोमन इच्छा असून हा सामना मुंबईत झाला तर तो एक आनंददायी सोहळाच असेल. हा सामना म्हणजे ‘सोने पे सुहागा’ असाच असेल.
-विनोद देशपांडे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष
सचिनचा दोनशेवा सामना नक्कीच मुंबईतच व्हायला हवा. कारण मुंबईतूनच त्याने प्रशिक्षणाचे बाळकडू घेतले आहे. तमाम क्रिकेटविश्व त्याच्यावर जीव ओवाळून टाकत असले तरी आपल्या माणसाचे प्रेम अवर्णनीयच असते. त्यामुळे मुंबईकरासांठी सचिनचा दोनशेवा सामना एक पर्वणी, सण असेल आणि सचिनचा हा सामना याची देही याचि डोळा पाहण्याची सर्वाचीच इच्छा असेल. हा सामना मुंबईला झाला तर सचिनबरोबरच त्याच्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या मुंबईकरांसाठी हा एक सोहळा असेल. त्यामुळे हा सामना मुंबईतच व्हायला हवा.
-दिनेश लाड, क्रिकेट प्रशिक्षक