लैंगिक टिप्पणीवरून टीकेचे लक्ष्य झालेला वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलच्या मागची साडेसाती सुटलेली नाही. सिडनी येथे सुरू असलेल्या बिग बॅश क्रिकेट स्पर्धेतील खराब कामगिरीवरून टीकाकारांनी त्याला पुन्हा लक्ष्य केले आहे.

सिडनी थंडर संघाविरुद्ध मेलबर्न रेनेगेड्स संघाकडून खेळताना धाव घेण्यास नकार दिल्यावरून त्याच्यावर टीका सुरू झाली आहे. त्याचा सहकारी टॉन कूपर हा धाव घेण्यास उत्सुक होता, मात्र गेलने त्यास नकार दिला. गेलच्या या वर्तनामुळे कूपरसह त्याच्या अन्य सहकाऱ्यांना कमालीचे आश्चर्य वाटले. एक धावदेखील सामन्याचा निर्णय बदलू शकते. गेल हा पुढच्याच षटकांत फवाद अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला.

‘गेल हा आक्रमक फलंदाजीबद्दल अनेक महान खेळाडूंच्या पंक्तीत बसणारा खेळाडू मानला जातो. मात्र त्याच्या या वर्तनामुळे युवा पिढीने कोणता आदर्श घ्यावा असाच संभ्रम निर्माण होणार आहे,’’ अशी ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग यांनी गेलच्या या वर्तनाबद्दल टीका केली. या सामन्यातील वर्तनाबद्दल गेलने पत्रकारांशी बोलण्यास सपशेल नकार दिला. लैंगिक टिप्पणी केल्याबद्दल गेलला सात हजार डॉलर्स दंड करण्यात आला होता.

Story img Loader