ICC Men’s ODI Player Rankings: भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरीच्या सामन्याआधी मोहम्मद सिराजला झटका बसला आहे. आयसीसी एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत त्याचे अव्वल स्थानावरून खाली घसरण झाली आहे. त्याच्या जागीदक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज जगातील क्रमांक-१ वन डे गोलंदाज बनला. सिराज आयसीसी एकदिवसीय गोलंदाजी रँकिंगमध्ये फक्त एक आठवडाभर अव्वल स्थानी राहिला. सिराज ८ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीला मागे टाकत जगातील नंबर वन वनडे गोलंदाज बनला होता, परंतु दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटूने ताज्या क्रमवारीत त्याचे स्थान घेतले आहे.
केशव महाराजाने १ नोव्हेंबरपासून विश्वचषकातील तीन सामन्यांत मिळून सात विकेट्स घेतल्या आहेत, ज्यात पुण्यात न्यूझीलंडविरुद्ध चार विकेट्सचा समावेश आहे. मात्र, सिराज आणि महाराज यांच्यात केवळ तीन मानांकन गुणांचा फरक आहे. सिराज हा वर्ल्ड कपमधील भारताचा आतापर्यंतचा पाचवा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने नऊ सामन्यांमध्ये १२ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये १६ धावांत तीन विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव या क्रमवारीत अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. बुमराह सध्याच्या विश्वचषकात नऊ सामन्यांत १७ विकेट्स घेणारा भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. गोलंदाजी क्रमवारीत मोहम्मद शमी १२व्या तर रवींद्र जडेजा १९व्या स्थानावर आहे.
भारताचा शुबमन गिल मात्र फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम दुसऱ्या स्थानावर आहे. गिल आणि त्याच्यामध्ये आठ रेटिंग गुणांचा फरक आहे. गिलने विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सात सामन्यांत २७० धावा केल्या आहेत. स्टार फलंदाज विराट कोहली चौथ्या स्थानावर कायम आहे. नऊ सामन्यांमध्ये दोन शतके आणि पाच अर्धशतकांसह ५९४ धावा करून तो या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
कर्णधार रोहित शर्मा पाचव्या तर श्रेयस अय्यर १३व्या स्थानावर आहे. लोकेश राहुल ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथसह संयुक्तपणे १७व्या क्रमांकावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत जडेजा दहाव्या स्थानावर आहे. बांगलादेशचा कर्णधार शाकिब-अल-हसन अव्वल स्थानावर आहे. घोट्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर असलेला हार्दिक पांड्या १६व्या स्थानी घसरला आहे.
वर्ल्ड कप २०२३च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारताविरुद्ध किवींचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. याच न्यूझीलंडने २०१९च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव करून चॅम्पियन होण्याचे स्वप्न धुळीस मिळवले होते. टीम इंडियाला पराभवासह धोनीच्या त्या अश्रूंचाही बदला घ्यायचा आहे. न्यूझीलंडनेही आपला नियमित कर्णधार केन विल्यमसनही संघात परतला आहे.