Pullela Gopichand : भारताचे बॅडमिंटनचे राष्ट्रीय मुख्य प्रशिक्षक आणि सायना नेहवालपासून पीव्ही सिंधू आणि किदम्बी श्रीकांतपर्यंत अनेक दिग्गज बॅडमिंटनपटूंच्या यशस्वी करिअर घडवण्यामध्ये मोलाचा वाटा राहिलेले पुल्लेला गोपीचंद यांनी भारतीय पालकांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. त्यांनी क्रीडा क्षेत्रात मुलाने भविष्य घडवावे अशी इच्छा असणार्या पालकांना खेळाडूंच्या जीवनातील दाहक वास्तविकता दाखवून दिली आहे.
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत बोलताना गोपीचंद यांनी खेळाडूंनी चकचकीत मैदानाच्या बाहेर दैनंदिन जीवनात येणार्या वाईट अनुभवाबद्दल भाष्य केले. खेळाडू जेव्हा त्यांच्या मैदानाबाहेर पाऊल टाकतात तेव्हा त्यांनी आर्थिक स्थैर्य देणार्या नौकरीच्या संधी उपलब्ध नसतात, स्पोर्ट कोट्यामधून नोकरी मिळालेल्या खेळाडूंना कामाच्या ठिकाणी अपमान सहन करावा लागतो, यासह इतरही बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला.
गोपीचंद म्हणाले की, “माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की, तो पुढचा सचिन होईल आणि २०० कोटी रुपये कमवेल या अपेक्षेने सगळं सोडून देऊन यामध्ये पडू नका, ९९ टक्के वेळा असे होणार नाही.”
पुढे बोलताना गोपीचंद म्हणाले की, “तनिषा क्रॅस्टो (बॅडमिंटन मिश्र दुहेरीत टॉप ३०) किंवा ट्रीसा जॉली (महिला दुहेरीत टॉप १०) सारखे खेळाडू त्यांचं सर्वस्व पणाला लावतात. पण जेव्हा ते माझ्याकडे येतात आणि विचारतात की ‘नोकरी आहे का?’, मला वाईट वाटते. ट्रीसा ही दोन वेळा ऑल इंग्लड सेमी फायनलीस्ट आहे, पण तरीही तीला वाटत असेल की ‘मला नोकरी हवी’ आणि नोकरीच्या संधी दुर्मिळ आणि लवकर हातातून निघून जाणार असतील तर काहीतरी मोठी चूक होत आहे. टॉप खेळाडू देखील… लक्ष्य सेन (जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक विजेता) याला गेल्या दीड वर्षापूर्वीच नोकरी मिळाली. सात्विक रेड्डी-चिराग शेट्टी (माजी वर्ल्ड नंबर वन) यांना देखील अनेक पदके जिंकावी लागली होती, त्यानंतरच त्यांना नोकरीसाठी विचारात घेण्यात आले,” असेही गोपीचंद म्हणाले.
पुढे बोलातना गोपीचंद यांनी जे पालक त्यांच्या मुलांसाठी खेळ हे एक संभाव्य करिअर म्हणून निवडण्याचा विचार करत आहेत पाहात आहेत, अशा पालकांना इशारा देखील दिला. “जर तुम्ही मध्यमवर्गीय पालक असाल आणि तुमच्यासाठी आर्थिक सुरक्षितता महत्त्वाची असेल तर तुमचे सर्वकाही खेळामध्ये गुंतवणे ही एक मोठी जोखीम आहे,” असे गोपीचंद म्हणाले.
निवृत्त झाल्यानंतर काम करणाऱ्या देशातील काही बड्या खेळाडूंना पाहून वेदना होतात असेही गोपीचंद म्हणाले. “तुम्ही कदाचित सर्वात उत्कृष्ट खेळाडू असाल, पण बऱ्याच जणांचे आयुष्य ते ज्या तरूण रेल्वे प्रशासकीय अधिकार्याला रिपोर्ट करताच त्यांच्यापेक्षा वाईट असू शकते. मी एका ५५ वर्षीय माजी आशियाई पदक विजेत्याला, ज्याला नागरी सेवेच्या आयएएससाठी नाकारण्यात आले होते अशा एका २४ वर्षांच्या ज्युनियर, सर्वात एंट्री-लेव्हलच्या व्यक्तीला, वाकून ‘हो, सर’ म्हणताना पाहिले आहे. तुम्ही तुमच्या संपर्क यादीतील (टॉप खेळाडूंच्या) पाच फोन क्रमांक निवडा आणि त्यांना कॉल करून विचारा की, ‘तुमचा रिपोर्टिंग अधिकारी कसा आहे?’ आणि ते सांगतील की ‘छळ होत आहे’ (टॉर्चर हो रहा है), असेही गोपीचंद यावेळी म्हणाले.
पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग (पीएसयू) नोकऱ्यांमध्येही करिअरची प्रगती निराशाजनक असल्याचा मुद्दा गोपीचंद यांनी उपस्थित केला. “कधीकधी त्यांच्या कारकिर्दीमध्ये सर्वोच वाढ होण्याची मर्यादा ही ‘ऑफिस चीफ सुपरिटेंडंट’ इतकीच असते, जी एका एन्ट्री लेव्हल नागरी सेवा अधिकार्याच्या जॉयनिंग रँकपेक्षा कमी असते. नंतर त्यांना सांगितलं जात की, ‘आनंदी राहा किमान तुला नोकरी तरी मिळाली’. त्यांचा वारंवार अपमान केला जातो आणि ‘निवांत स्पोर्ट कोटामधून आलात’ (मस्ती से स्पोर्ट्स कोटा में आ गये) हे ऐकवलं जातं. हे अपमानजनक आहे,” असेही गोपीचंद ते म्हणाले.