लागोपाठच्या स्पर्धामुळे भारतीय खेळाडूंची शारीरिक व मानसिक दमछाक होत असून त्याचा त्यांच्या कामगिरीवर अनिष्ट परिणाम होतो. मात्र काही वेळा नाइलाजास्तव खेळाडूंना या गोष्टी सहन कराव्या लागतात असे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी सांगितले.
माजी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रकाश पदुकोण यांनी अलीकडेच भारतीय खेळाडू आवश्यकतेपेक्षा जास्त स्पर्धा खेळत असल्याचे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना गोपीचंद म्हणाले, दोन स्पर्धामध्ये थोडय़ा दिवसांचे अंतर आवश्यक आहे. मात्र संपूर्ण जगातील विविध स्पर्धाची कार्यक्रमपत्रिका ठरवताना अशा गोष्टी लक्षात घेतल्या जात नाहीत. भारतीय खेळाडूंना अशा स्पर्धाबरोबरच राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धामध्येही पुढील वर्षी खेळावे लागणार आहे. त्यामुळेच काही वेळा प्रवासाच्या कालावधीतच प्रशिक्षण घ्यावे लागते.
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या दुसऱ्या फळीतील खेळाडूंना संधी देणार काय असे विचारले असता गोपीचंद म्हणाले, राष्ट्रकुल ही आपल्यासाठी प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. त्यामुळे पदक मिळविण्यासाठी सर्वोत्तम खेळाडूंनाच संधी द्यावी लागेल. अर्थात या स्पर्धेस अजून बराच वेळ आहे. त्यादृष्टीने मी सराव व स्पर्धामधील सहभाग याबाबत योग्य नियोजन करीत आहे. तसेच संबंधित खेळाडू व अन्य सपोर्ट स्टाफबरोबरही मी सविस्तर चर्चा करणार आहे.
सिंधूच्या उपविजेतेपदाविषयी ते म्हणाले, मला तिच्या कामगिरीबाबत काळजी वाटत नाही. तिने यंदा अनेक स्पर्धामध्ये उपविजेतेपदे मिळविली असली, तरी मी समाधानी आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामध्ये ती अव्वल यश मिळविल याची मला खात्री आहे. ती जेमतेम २२ वर्षांची असून तिला अजून भरपूर करिअर करायचे आहे.