बहुचर्चित इंडियन बॅडमिंटन लीग (आयबीएल)मध्ये ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांची पायाभूत किंमत प्रत्येकी ५०,००० अमेरिकन डॉलर्स ठरवण्यात आली होती. मात्र आयबीएल व्यवस्थापनाने या दोघींना कोणताही कल्पना न देता ती निम्म्यावर आणली. या प्रकाराने व्यथित झालेल्या ज्वालाने माझ्या रॅकेटनेच आाता मी उत्तर देईन, असे उद्गार काढले.
‘‘या सर्व प्रकाराची आम्हाला कल्पना द्यायला हवी होती, एवढीच आमची माफक अपेक्षा होती. आयबीएल स्पर्धेचा भाग असल्याचा मला मनापासून आनंद आहे. चांगल्या कामगिरीसाठी मी उत्सुक आहे. बॅडमिंटन कोर्ट हा माझा प्रांत आहे. या कोर्टवर रॅकेटच्या माध्यमातूनच योग्य उत्तर देईन,’’ असे ज्वालाने सांगितले.
ती पुढे म्हणाली, ‘‘मी काही बोलले तर मी तक्रारी करते, मी बंडखोर आहे, या चर्चाना ऊत येईल. मला याआधीच बंडखोर ठरवण्यात आले आहे. पण गेल्या दोन दिवसांत जे घडले ते अनपेक्षित होते.’’
आयबीएल लिलावात ज्वालाला दिल्ली स्मॅशर्स संघाने ३१,००० अमेरिकन डॉलर्सना विकत घेतले तर पुणे पिस्टॉन्स संघाने अश्विनीला पायाभूत किंमतीलाच म्हणजे २५,००० अमेरिकन डॉलर्सना खरेदी केले.
‘‘आंतरराष्ट्रीय स्तरावरील माझ्या चांगल्या कामगिरीमुळेच देशात दुहेरी प्रकार लोकप्रिय होण्यास मदत झाली आहे. मी देशासाठी खेळताना गौरवास्पद कामगिरी केली आहे, पदके जिंकली आहेत. दुहेरी प्रकारात मी आणि अश्विनीआधी कोणीच नव्हते. आमच्या खेळानेच लोकांचा दुहेरीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. माझ्या दिमाखदार कामगिरीनंतरच चाहत्यांनी दुहेरी प्रकारातून पदकाची अपेक्षा करायला सुरुवात केली. त्यामुळे आयबीएल लिलावाचा प्रकार दुखावणारा होता. आम्हीही तेवढीच मेहनत घेतो. मी राजकारणात कधीही सामील होत नाही. पण नेहमी मला त्यात ओढले जाते. या सर्व गोष्टींना आता मी सरावले आहे,’’ असे ज्वाला यावेळी म्हणाली.
‘‘आयकॉन खेळाडू म्हणून करारावर स्वाक्षरी केली, तेव्हा कोणालाही आनंद होणे साहजिक आहे. आयबीएलचा प्रचार करण्यात मी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अनेक शहरांमध्ये जाऊन मी या स्पर्धेबद्दल माहिती दिली आहे. आयकॉन खेळाडूंना समान वागणूक मिळेल अशी माझी अपेक्षा होती,’’ असे तिने सांगितले.
आयबीएल स्पर्धेतून महिला दुहेरी प्रकारच काढून टाकल्यामुळे पायाभूत किंमत कमी झाली असावी का, या प्रश्नाला उत्तर देताना ज्वाला म्हणाली, ‘‘मी दुहेरीची खेळाडू आहे, हे आयबीएल व्यवस्थापनाला माहिती आहे. मी एकेरीतही खेळावे अशी त्यांची अपेक्षा असेल तर मी काय बोलणार. महिला आणि मिश्र दुहेरी प्रकारात मी खेळू शकते. मिश्र दुहेरी प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर मी अव्वल सहा खेळाडूंमध्ये आहे. त्यामुळे याबाबत आक्षेप घेण्याचा प्रश्नच नाही. जर महिला दुहेरी नसल्यामुळे पायाभूत किंमत कमी झाली असेल तर हे अतिशय विचित्र आहे. एकेरीचे खेळाडूही केवळ एकेरीतच खेळतात. दिल्ली संघासाठी सर्वोत्तम प्रदर्शनासाठी मी तयार आहे.’’
संयोजकांच्या निर्णयाचे गोपीचंदकडून समर्थन
कोलकाता : ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा या दुहेरीतील अतिशय उच्च दर्जाच्या खेळाडू आहेत. त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून भारतीय बॅडमिंटन लीग (आयबीएल) संयोजकांनी त्यांची किमान किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला, असे राष्ट्रीय प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी येथे सांगितले. संयोजकांचा निर्णय योग्यच आहे असे सांगून गोपीचंद म्हणाले, जर या खेळाडूंना ५० हजार डॉलर्स बोली मिळाली नसती तर त्यांना काहीच फायदा झाला नसता. आता निदान त्यांना चांगली रक्कम मिळणार आहे. ज्वाला व अश्विनी यांना अनुक्रमे ३१ हजार व २५ हजार डॉलर्सचा भाव मिळाला आहे. या दोन्ही खेळाडू एकेरीचे सामने खेळत असल्यामुळे मिळालेल्या किंमतीबाबत त्यांनी समाधान मानले पाहिजे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा