राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याचा मार्ग मोकळा
सात आंतरराष्ट्रीय पदके पटकावणारी बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंत हिने प्रसिद्ध बॅटमिंटनपटू आणि भारतीय बॅटमिंटन असोसिएशनचे प्रमुख प्रशिक्षक पी. गोपीचंद यांच्याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे. हैदराबाद येथील गोपीचंद अकादमीमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात प्रवेश नाकारल्यानंतर प्राजक्ताने हे पाऊल उचलत गोपीचंद यांनी आपला मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. मात्र न्यायालयाने प्राजक्ताला दिलासा देत शिबिरात सहभागी होण्याचे निर्देश दिले आहेत.
मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर तिच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. त्या वेळेस न्यायालयाने तिला गोपीचंद अकादमीत होणाऱ्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याची परवानगी देत भारतीय क्रीडा प्राधिकरणालाही (एसएआय) नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठीच्या निवडी या गुणवत्तेच्या आधारे करण्याचे आदेश दिले आहेत.
महिला दुहेरीच्या जागतिक यादीत ४८ स्थानावर असलेल्या प्राजक्ताने याचिकेत दावा केला आहे की, ऑक्टोबर ४ ते १२ डिसेंबर या कालावधीत हे शिबीर होणार आहे. परंतु तिने महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीसाठी सहकारी बदलण्याची विनंती केल्याने गोपीचंद यांनी तिला शिबिरात सहभागी होऊ नकोस, असे सांगितले. गोपीचंद यांनी २२ ऑगस्ट २०१२ रोजी त्यासंदर्भातील ई-मेलही आपल्याला पाठविल्याचा दावा प्राजक्ताने केला
आहे.     
सायनाने घेतली गोपीचंदची बाजू
मानसिक छळासारख्या गोष्टींचे आरोप गोपीचंदसारख्या व्यक्तीवर होणे माझ्या आकलनापलीकडचे आहे. माझे उदाहरण बघा. जागतिक क्रमवारीत मी तिसऱ्या स्थानी आहे. यामागे गोपीचंद सरांचे अमूल्य योगदान आहे, त्यासाठी मी त्यांची आभारी आहे.