मागील वर्षी आपल्या यशस्वी कामगिरीने बॅडमिंटन कोर्ट्स गाजविणाऱ्या पी. व्ही. सिंधूने चालू वर्षांसाठी काही खास संकल्प केले आहेत. या वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पध्रेत पदकासहित जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल सहा खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्याचे लक्ष्य तिने उराशी बाळगले आहे. २०१३ हे वर्ष सिंधूने आपल्या धडाकेबाज खेळाने गाजवले. चीनमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या सिंधूने मलेशिया आणि मकाऊ येथील ग्रां.प्रि. स्पर्धामध्ये सुवर्णपदकांची लयलूट केली. त्यामुळेच तिच्या आशा उंचावल्या आहेत. २०१४ या वर्षांची सुरुवातही तिच्यासाठी अनुकूल अशीच झाली आहे. लखनौमध्ये झालेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पध्रेत तिने उपविजेतेपद पटकावले, तर कोचीमध्ये झालेल्या अखिल भारतीय वरिष्ठ नामांकन स्पध्रेत विजेतेपद प्राप्त केले. आता ४ ते ९ मार्चला होणाऱ्या अखिल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पध्रेसाठी १८ वर्षीय सिंधू सज्ज होत आहे. ‘‘या वर्षी एकपाठोपाठ स्पर्धा आल्या आहेत. परंतु फेब्रुवारी महिन्यात मी निवांत असल्यामुळे माझे फटके आणि बचाव यावर मी बारकाईने मेहनत घेत आहे. अखिल इंग्लंड स्पध्रेसाठी माझी चांगली तयारी सुरू आहे. या स्पध्रेत किमान उपांत्य फेरी गाठण्याचे उद्दिष्ट मी समोर ठेवले आहे,’’ असे सिंधूने सांगितले.
      

Story img Loader