भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला गॅस्ट्रोएन्टेरायटिस हा आजार झाला असून तिने आजाराबाबत इन्स्टाग्राम पोस्ट लिहून माहिती दिली आहे. सायना ही गेल्या आठवड्यापासून त्रासाने ग्रासलेली होती. त्यामुळे तिने एक महत्वाची स्पर्धा न खेळण्याचा निर्णय घेतला आणि मायदेशी परतणे पसंत केले. सायनाला डॉक्टरनी रुग्णायल्यात दाखल होऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार सायनाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सायनाने याबाबत आपला आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये माहिती दिली आहे.
‘एक वाईट बातमी आहे. गेल्या सोमवारपासून माझ्या पोटात तीव्र वेदना होत होत्या, पण तरीदेखील मी ‘ऑल इंग्लंड’ स्पर्धेतील काही सामने खेळून काढले. आता मात्र मला या वेदना अजिबातच सहन होत नाहीत. त्यामुळे मी आगामी स्वीस ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. डॉक्टरांनी मला रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे. मी लवकर या आजारातून ठणठणीत होईन आणि बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात करेन’, असे तिने पोस्टमध्ये लिहिले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशीप स्पर्धेत सायनाने दमदार कामगिरी केली होती. पण तैवानच्या ताय झू यिंगविरुद्धची पराभवाची कोंडी फोडण्यात सायना नेहवालला पुन्हा एकदा अपयश आले. ताय झूच्या ताकदवान फटक्यांसमोर भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना अपयशी ठरल्यामुळे ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याचे तिचे स्वप्न अधुरेच राहिले. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या ताय झू हिने ३७ मिनिटे रंगलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सायनाला २१-१५, २१-१९ असे पराभूत केले. सायनाचा हा ताय झूविरुद्धचा १५वा पराभव ठरला असून सलग १३ सामन्यांमध्ये सायनाला तिच्याकडून हार पत्करावी लागली आहे. २०१५ नंतर सायनाने ताय झूविरुद्धची एकही लढत जिंकलेली नाही.
पण सायना नेहवालने यंदाच्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला गटाचेही विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीत सायनाने सिंधूचा दोन सेटमध्ये पराभव केला. सायनाचे हे चौथे राष्ट्रीय विजेतेपद होते. या आधी २००६, २००७ आणि २०१८ साली या स्पर्धेचे विजेतेपद तिने पटकावले होते. यानंतर सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदाला गवसणी घालत सायनाने आपला फॉर्म कायम असल्याचे दाखवून दिले. या सामन्याच्या अंतिम सामन्यात सायनाने सिंधूची झुंज सरळ दोन सेटमध्ये २१-१८, २१-१५ अशी मोडून काढली. सिंधूने याआधी २०११ आणि २०१३ साली राष्ट्रीय स्पर्धेचं विजेतेपद पटकावले होते.