क्रिकेटेतर खेळांसाठी ऑलिम्पिक, राष्ट्रकुल तसेच आशियाई क्रीडा स्पर्धा अत्यंत प्रतिष्ठेच्या असतात. असंख्य खेळांच्या भाऊगर्दीत हमखास पदक मिळण्याची शाश्वती असलेल्या खेळांमध्ये बॅडमिंटनचा समावेश होतो. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची धाव कांस्यपदकापर्यंत मर्यादित राहिली आहे. मात्र या वेळी पदकाचा रंग बदलण्यासाठी भारतीय बॅडमिंटन चमू सज्ज झाला आहे.
या स्पर्धेपूर्वी सायनाने गोपीचंद यांच्याऐवजी विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे लोकप्रिय आणि यशस्वी ‘गोपीचंद-सायना’ गुरुशिष्याची जोडी तुटणार अशा चर्चा रंगू लागल्या. गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली सायनाने दिमाखदार कामगिरी केली आहे. सायनाच्या आतापर्यंतच्या वाटचालीत गोपीचंद यांची भूमिका निर्णायक आहे. मात्र ऑलिम्पिक यशानंतर सायनाच्या कामगिरीत घसरण झाली आहे. नवीन प्रशिक्षक आणि हैदराबादऐवजी बंगळुरू हे सरावाचे नवीन ठिकाण सायनाचे नशीब पालटवू शकते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. राष्ट्रीय प्रशिक्षकाची जबाबदारी आणि स्वत:च्या अकादमीतील अन्य खेळाडू यामुळे गोपीचंद सायनाला वेळ पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. सिंधू आणि कश्यपच्या यशामुळे गोपीचंद यांचा विद्यार्थ्यांचा प्राधान्यक्रमही बदलला आहे. या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन सायनाने काही काळासाठी का होईना, पण बदल स्वीकारला आहे. आशियाई स्पर्धेत पदक पटकावल्यास हा तात्पुरता बदल प्रदीर्घ काळासाठी रूपांतरित होऊ शकतो. या स्पर्धेच्या निमित्ताने विजयपथावर परतण्यासाठी सायनाची खेळी किती यशस्वी ठरते, यावर नव्या समीकरणांची नांदी ठरू शकते.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक विजेती सिंधू तोच फॉर्म कायम राखण्यासाठी आतुर आहे. दुखापतींचा ससेमिरा असतानाही पारुपल्ली कश्यपने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. मात्र त्यानंतर झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सलामीच्या लढतीतच त्याचे आव्हान संपुष्टात आले. गुणवत्तेला, कौशल्याला सातत्याची जोड देण्याची कश्यपला सर्वोत्तम संधी आहे. दुहेरीत अश्विनी पोनप्पाच्या साथीने प्रज्ञा गद्रेला संधी मिळण्याची शक्यता आहे. पुरुष दुहेरीत अक्षय देवलकर आणि प्रणव जेरी चोप्रा जोडीवर भिस्त आहे.
भारतीय संघ
पुरुष- पारुपल्ली कश्यप, आरएमव्ही गुरुसाई दत्त, किदम्बी श्रीकांत, सौरभ वर्मा, मनू अत्री, बी. सुमीत रेड्डी, प्रणव चोप्रा, अक्षय देवलकर. महिला- सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, तन्वी लाड, पी. सी. तुलसी, अश्विनी पोनप्पा, प्रज्ञा गद्रे, एन. सिक्की रेड्डी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा