सलग दोन सामने जिंकत ‘ब’ गटामध्ये अव्वल स्थान पटकावलेल्या मुंबईच्या संघापुढे चौथ्या रणजी सामन्यात बडोद्याचे आव्हान असेल. आतापर्यंत मुंबईने पंजाब आणि तामिळनाडू यांच्यावर विजय मिळवला असून विजयी हॅट्ट्रिकसाठी मुंबईचा संघ सज्ज आहे.
पंजाबविरुद्ध श्रेयस अय्यरच्या द्विशतकाच्या जोरावर मुंबईने सहज विजय मिळवला होता. पण तामिळनाडूविरुद्धच्या सामन्यात मुंबईची पहिल्या डावात ५ बाद ५२ अशी धावसंख्या होती. त्यावेळी सिद्धेश लाडने झळकावलेले झुंजार दीडशतक आणि फिरकीपटू विशाल दाभोळकरच्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने हा सामना जिंकला होता. पण या सामन्याच्या अखेरच्या डावात मुंबईच्या फलंदाजांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली होती. श्रेयस, सिद्धेश हे दोन्ही मुंबईचे फलंदाज सातत्याने चांगल्या धावा करत आहेत. पण अन्य फलंदाजांना सातत्यपूर्ण फलंदाजी करता आलेली नाही. गोलंदाजीमध्ये वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि विशाल भेदक मार करत आहेत.
बडोद्याने आतापर्यंत तीन सामन्यांपैकी एका सामन्यात विजय मिळवला असून, एका सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्याचबरोबर एक सामना अनिर्णीत राखल्याने त्यांच्या खात्यामध्ये आठ गुण आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा