देशात बॅडमिंटनला अन्य खेळांच्या भाऊगर्दीतून बाहेर काढत स्वतंत्र ओळख मिळवून देणाऱ्या सायना नेहवालच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. प्रतिष्ठेच्या ‘पद्मभूषण’ पुरस्कारासाठी भारतीय बॅडमिंटन संघटनेने क्रीडा मंत्रालयाकडे सायनाच्या नावाची शिफारस केली आहे. क्रीडा मंत्रालय सायनाच्या नावाची गृह मंत्रालयाला शिफारस करू शकते.
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावत इतिहास घडवणाऱ्या सायनानेच प्रकाश पदुकोण-पुल्लेला गोपीचंद यांच्यानंतरच्या गौरवशाली पर्वाची मुहूर्तमेढ रोवली. ऑलिम्पिक स्पर्धेत, बॅडमिंटनमध्ये भारताला पदक मिळवून देणारी सायना ही एकमेव खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तिच्या सातत्यपूर्ण प्रदर्शनाची नोंद घेत २०१० मध्ये सायनाला खेलरत्न आणि पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. २००९ मध्ये सायनाला अर्जुन पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते.  
आंतरराष्ट्रीय स्तरावरची चीनची मक्तेदारी मोडून काढत सायनाने सुपरसीरिज प्रीमियर, सुपरसीरिज, ग्रां.प्रि. स्पर्धाची जेतेपदे नावावर केली. लंडन ऑलिम्पिकनंतर खराब फॉर्म आणि दुखापतींचा ससेमिरा सायनाच्या मागे लागला होता. यामुळे तब्बल दीड वर्ष तिला एकाही सुपरसीरिज स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा करता आला नाही.
काही दिवसांपूर्वीच दुखापतीतून सावरलेल्या सायनाने अविरत मेहनतीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन सुपर सीरिजचे जेतेपद पटकावले. ऑलिम्पिक पदकानंतर सायनाची कारकीर्द संपली, पदक प्रेरणा ठरण्याऐवजी कारकिर्दीला पूर्णविराम ठरणार अशी बरीच टीका सायनावर झाली होती. मात्र सुपर सीरिज स्पर्धेच्या जेतेपदासह सायनाने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. ग्लासगो, स्कॉटलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सायना सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार होती. मात्र दुखापतीमुळे तिने माघार घेतली. इन्चेनॉन, दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सायनाकडून पदकाची अपेक्षा आहे.
‘भारतरत्न’ पुरस्कारासाठी मीसुद्धा योग्य -बलबीर सिंग
चंडीगढ : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची भारतरत्न सन्मानासाठी शिफारस झाल्यानंतर ज्येष्ठ हॉकीपटू बलबीर सिंग (वरिष्ठ) यांनाही हा सन्मान मिळण्याची आशा वाटत आहे. नव्वद वर्षांच्या बलबीर यांनी तीन वेळा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत भारतास सुवर्णपदक मिळवून दिले होते. ते म्हणाले, ‘‘हॉकीच्या कारकिर्दीविषयी मी समाधानी आहे. मात्र आपला योग्य सन्मान झाला नाही. मला फक्त पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. कोणतेही सन्मान व पुरस्कार हे शासनाच्या मर्जीनुसार दिले जातात, याचे मला खूप दु:ख वाटते. जर खेळाडू, कर्णधार, प्रशिक्षक, व्यवस्थापक, संघटक आदी विविध भूमिकांमध्ये मी केलेली कामगिरी पाहिली तर मी निश्चितच ‘भारतरत्न’ सन्मानासाठी योग्य आहे असे मला वाटते. मात्र हा सन्मान जिवंतपणी मिळाला तर मला त्याचा खरा आनंद मिळेल. मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न सन्मान मिळाला तर तो हॉकीचाच गौरव असेल.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा