आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या एका न्यायालयाने हे वॉरंट जारी केलं आहे. एका रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये घर खरेदीदारांच्या कथित फसवणूक प्रकरणात समन्स पाठवल्यानंतरही न्यायालयात हजर न राहिल्याने बुधवारी गंभीरविरोधात न्यायालयाने जामिनपात्र वॉरंट जारी केलं.
काय आहे प्रकरण –
गंभीर हा रुद्रा बिल्डवेल रिअॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड आणि एच आर इंफ्रासिटी प्रायव्हेट लिमिटेड या रिअल इस्टेट कंपनीच्या संयुक्त प्रोजक्टचा संचालक आणि ब्रँड अॅम्बेसिडर होता. 17 फ्लॅट धारकांनी केलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी 2011 मध्ये गाझियाबादच्या इंदिरापुरम परिसरातील एका प्रोजेक्टमध्ये फ्लॅटच्या बुकिंगसाठी 1.98 कोटी रुपये दिले होते, मात्र या प्रोजक्टचं काम सुरूच झालं नाही. 2016 मध्ये या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान कधीही न्यायालयात उपस्थित न राहिल्याने तसंच सुनावणीच्या अखेरच्या तारखेला न्यायालयात उपस्थित राहण्यामध्ये सूट मिळावी यासाठी त्याने दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतरही तो हजर राहिला नाही, त्यामुळे न्यायालयाने 10 हजार रुपयांचा जामिनपात्र वॉरंट जारी केला. 24 जानेवारी रोजी या प्रकऱणाची पुढील सुनावणी होणार आहे.
गौतम गंभीरने नुकतीच क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती स्वीकारलीये. त्याने 58 कसोटीत 4154 धावा, 147 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5238 धावा आणि 37 ट्वेंटी-20 सामन्यात 932 धावा केल्यात.