सध्या तो प्रो कबड्डीचा बाजीराव ठरला आहे.. पण त्याला हे यश मिळाले ते बऱ्याच अडणींवर मात केल्यावरच.. डिलाइल रोडच्या बीडीडी चाळीत त्याचे बालपण गेले.. त्याचे बाबा कुस्ती खेळायचे.. मोठय़ा भावाला चांगला खेळाडू बनवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते.. तो चांगला खेळायचाही, पण काही गोष्टींमुळे तो मोठा खेळाडू होऊ शकला नाही.. पण मोठा भाऊ मोठा खेळाडू होऊ शकत नसेल तर काय झाले. बाबांचे स्वप्न आपण पूर्ण करायचे, ही खूणगाठ त्याने मनाशी बांधली.. सुरुवातीला तो कुस्ती खेळायचा, त्यानंतर खो-खो, पण कबड्डीमध्ये तो स्थिरावला.. अनंत अडचणींचा सामना करत आता तो प्रो कबड्डीचा बाजीराव ठरला आहे.. त्याचे नाव बाजीराव होडगे. त्याला भरपूर प्रसिद्धी, ग्लॅमर, चांगले मानधनही मिळाले, पण तरीही तो समाधानी नाही.. कारण मुंबई किंवा महाराष्ट्राकडून त्याला खेळण्याची संधीच मिळत नाही, त्यामुळे त्याचे भारताचे प्रतिनिधित्व करायचे स्वप्न पूर्ण झालेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


‘‘ माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कबड्डीमध्ये आलो आहे. तो एकच माझा ध्यास होता. डिलाइल रोडमध्ये मी एकटाच कबड्डीचा सराव करायचो. लोकं त्यावेळी वेडय़ात काढायचे. वडिल मिल कामगार असल्याने घरची परिस्थिती बेताचीच होती. पण माझ्यामध्ये कबड्डीचे असलेले वेडच मला इथपर्यंत घेऊन आले आहे. कितीही मेहनत करायची माझी तयारी आहे. जिद्द, शिकण्याची वृत्ती आणि चिकाटी आहे. त्या जोरावर मी प्रो कबड्डीमध्ये खेळू शकलो,’’ असे बाजीराव सांगत होता.
प्रो कबड्डीबद्दल बाजीराव म्हणाला की, ‘‘ मी महाराष्ट्र पोलीस संघातून खेळतो. या स्पर्धेने माझ्यासारख्या होतकरू खेळाडूंना व्यासपीठ मिळवून दिले आहे. मला मुंबईकडून किंवा महाराष्ट्राकडून खेळता येत नसले तरी या प्रो कबड्डीमुळे मला देशभरातून चांगल्या प्रतिक्रिया आहेत. पण माझे स्वप्न देशाकडून खेळायचे आहे, पण काही कारणांमुळे ते पूर्ण होताना दिसत नाही.’’
राजकारणामुळे देशभराने डोक्यावर घेतलेला हा खेळाडू अजूनही मुंबई शहर कडून खेळू शकलेला नाही किंवा त्याची दखल त्यांनी घेतलेली नाही. खेळाडू हा त्याच्या कामगिरीसाठी ओळखला जातो. पण नेत्रदीपक कामगिरी करूनही जर संघात स्थान मिळत नसेल तर बाजीरावसारख्या खेळाडूंनी करायचे काय, हा मोठा प्रश्न आहे.
याबद्दल विचारले असता बाजीराव म्हणाला की, ‘‘ माझे काम फक्त कबड्डी खेळणे आहे. मला पैशांची लालसा नाही. फक्त नाव चांगले व्हायला हवे, जेणेकडून माझ्या वडिलांना आनंद होईल. मुंबई, महाराष्ट्र आणि भारताकडून मी का खेळत नाही, ते मला माहिती नाही. बहुतेक मीच कुठेतरी कमी पडत असेन. माझ्या हातामध्ये फक्त खेळण्याचा पर्याय आहे. तेच मी करत आहे. देशाकडून खेळण्याचे स्वप्न कधी साकारणार, याचीच वाट मी पाहत आहे.’’