पतियाळा : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सरावाला पसंती देत बजरंग पुनिया आणि दीपक पुनियाने जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतून माघार घेतली आहे. दोघेही आता सरावासाठी परदेशात जाणार आहेत.
जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी रविवारी पुरुषांच्या फ्री-स्टाईल विभागाची पात्रता फेरी पार पडली. सेना दलाकडून प्रवेशिका असलेल्या महाराष्ट्राच्या पृथ्वीराज पाटीलने ९२ किलो वजनी गटातून आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर गौरव बलियानचा पराभव करून जागतिक स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली. दोन वर्षांपूर्वी २०२१ मध्ये साताऱ्यात झालेल्या राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अधिवेशनात पृथ्वीराज पाटीलने महाराष्ट्र केसरी किताब पटकावला होता. मूळचा कोल्हापूरचा असणारा पृथ्वीराज पाटील गेली काही वर्षे पुण्यात लष्कराच्या घोरपडी येथील क्रीडा केंद्रात सराव करत आहे.
बजरंगने आशियाई क्रीडा स्पर्धेला पसंती दिली असून, सरावासाठी बजरंग तातडीने किर्गिझस्तान येथे रवाना होणार असल्याचे कुस्तीगीर महासंघाच्या हंगामी समितीच्या वतीने सांगण्यात आले. यासाठी बजरंगने क्रीडा प्राधिकरणाकडे तंदुरुस्ती प्रमाणपत्रही सादर केले आहे. बजरंगच्या ६५ किलो वजनी गटात आशियाई चाचणीप्रमाणे विशाल कालिरामणनेच बाजी मारली. विशेष म्हणजे बजरंगला आशियाई स्पर्धेसाठी थेट संघात स्थान देण्यात आल्यामुळे कालिरामणला आशियाई स्पर्धेपासून वंचित रहावे लागले.