एकीकडे खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा करायची, तर दुसरीकडे त्यांचा दौऱ्याचा खर्च अमान्य करीत खेळाडूचे खच्चीकरण करायचे, अशी दुटप्पी भूमिका भारतीय खेळ प्राधिकरणाने (साई) घेतल्यामुळे  विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावलेल्या बजरंग कुमारला अमेरिकेत होणाऱ्या डेव्ह शल्ट्झ स्मृती आंतरराष्ट्रीय स्पर्धेला मुकावे लागण्याची शक्यता आहे.
राष्ट्रकुल, आशियाई आणि विश्व अजिंक्यपद स्पर्धा काही महिन्यांवर आल्या असताना बजरंगला या स्पर्धेतून चांगला अनुभव मिळाला असता. बजरंगला पाठवण्याचे ठरलेही होते, पण अगदी अखेरच्या क्षणी ‘साई’ने हात वर करीत बजरंगचा प्रवास आणि राहण्याचा खर्च उचलू शकत नसल्याची भूमिका मांडली. आपल्या सहकाऱ्यांबरोबर विमानतळावर पोहोचण्याच्या एक तासापूर्वी बजरंगला ही कटू बातमी देण्यात आली असून यामुळे बजरंगचे मानसिक खच्चीकरण झाले असल्याचे समजते.
याबाबत बजरंगशी संवाद साधला. तो म्हणाला की, ‘‘मी अमेरिकेत स्पर्धेला जाऊ शकत नाही, अशी माहिती मला महासंघाने दिली. माझे तिकीट आणि व्हिसाही तयार असून माझ्यासाठी ही वेदनादायी गोष्ट आहे. नेमके काय घडले, याबाबत मला काहीच कल्पना नाही. याबाबत मी प्रशिक्षक यशवीर सिंग यांच्याशी संवाद साधला असून मला लवकरच अमेरिकेत पाठवण्यात येईल, असे त्यांनी मला सांगितले. मला तिथे जायचे असून स्पध्रेत सहभागी व्हायचे आहे.’’

Story img Loader